20 February 2019

News Flash

‘फेअरनेस क्रीम’च्या वापरावर निर्बंध?

केंद्रीय औषध नियंत्रक विभागाचा प्रस्ताव

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

केंद्रीय औषध नियंत्रक विभागाचा प्रस्ताव; ‘हायड्रोक्विनोन’ घटकाचे दुष्परिणाम

रंग उजळविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘फेअरनेस’ क्रीमच्या वापरावर आता बंधने येणार आहेत. ‘हायड्रोक्विनोन’ घटक असलेल्या रंग उजळविण्यासाठीच्या क्रीमच्या अतिवापराने त्वचेवर दुष्परिणाम होत असल्याने प्रिस्क्रिप्शनशिवाय या क्रीमच्या विक्रीवर लवकरच बंदी येण्याची शक्यता आहे. केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने औषधे व सौर्दयप्रसाधने कायद्यामध्ये ही सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले आहे.

बाजारामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये रंग उजळविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रीमचा सुळसुळाट झाला आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांच्या दुकानातून सहज उपलब्ध होणाऱ्या या क्रीमचा वापर सर्रास केला जातो. या क्रीममधील ‘हायड्रोक्विनोन’च्या अतिवापराचे त्वचेवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन त्याच्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी या घटकाचा समावेश असणाऱ्या क्रीमचा ‘शेडय़ूल एच’ वर्गामध्ये समावेश करावा, असे नियंत्रक विभागाने प्रस्तावित केले आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याअंतर्गत या क्रीम येत असल्याने या कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव सूचनांसाठी खुला केला आहे.

या क्रीमचा समावेश शेडय़ूल एच अंतर्गत झाल्यास प्रिस्क्रिप्शनशिवाय या क्रीमची विक्री औषधविक्रेत्यांना करता येणार नाही. तसेच वैद्यकीय सल्ल्याशिवाय या क्रीम औषधांच्या दुकानातून विक्री केल्यास कायदेशीर कारवाई देखील केली जाईल, असे या सुधारणेमध्ये नमूद केले आहे.

त्वचेवर लावण्यात येणाऱ्या स्टिरॉईडयुक्त क्रीमचा वैद्यकीय सल्ल्याशिवाय सुरू असलेल्या वापरामुळे बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाण गेल्या काही वर्षांत नोंद घेण्याइतपत वाढले. याची दखल घेत केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने औषधे व सौर्दयप्रसाधने कायद्यामध्ये सुधारणा करत स्टिरॉईडयुक्त क्रीमचा ‘शेडय़ूल एच’ वर्गामध्ये समावेश केला. त्यामुळे स्टिरॉईडयुक्त क्रीमच्या वापरावर निर्बंध आले असले, तरी रंग उजळविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रीमचा मात्र खुलेपणाने वापर सुरू आहे. रंग उजळविणे, डाग घालविणे, ‘हायड्रोक्विनोन’चा वापर हा रंग उजळवणाऱ्या क्रीम, ब्लीच आदी उत्पादनांमध्ये केला जातो. हा घटक असलेली बाजारामध्ये सध्या १०० हून अधिक उत्पादने उपलब्ध असून यांचा सर्रास वापर केला जातो. हायड्रोक्विनोन घटक असलेल्या क्रीम सातत्याने त्वचेवर लावल्याने ते त्वचेवर साठत जाते. त्यामुळे त्वचेवर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे औषधांच्या दुकानातून घेऊन थेट वापर करण्याऐवजी असून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचा उपयोग करणे गरजेचे आहे, असे केईएम रुग्णालयातील त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. उदय खोपकर यांनी सांगितले.

कर्करोगाचा धोका

हायड्रोक्विनोनयुक्त क्रीमच्या अतिवापराने कर्करोग होऊ शकतो, हे उंदरांवरील प्रयोगातून दिसून आले होते. त्यामुळे परदेशामध्ये या घटकाच्या क्रीमच्या वापरावर बंदी आणली आहे. हायड्रोक्विनोन घटकाचा वापर २ टक्क्य़ांपर्यत असेल तर त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. परंतु भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या क्रीममध्ये या घटकाचा वापर ४ टक्क्य़ांपर्यत होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या क्रीमच्या वापरावर निर्बंध आणणे आवश्यक असल्याचे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. के.ई.मुकादम यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

First Published on October 12, 2018 2:16 am

Web Title: fairness cream ban