शासकीय मुद्रांकांवर पूर्वीच्या तारखांचे शिक्के मारून खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अटक केली आहे. यातील ९ जणांना अटक करण्यात आली असून त्यात काही वकिलांचाही समावेश आहे. या टोळीचे जाळे आंतरराज्य स्तरावर पसरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईतील स्थानिक न्यायालय परिसरात नोटरी करून देणारे काही जण शासकीय मुद्रांकांवर जुन्याच तारखांचे शिक्के मारून बनावट कागदपत्रे तयार करून देत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाला मिळाली. या मुद्रांकांची चढय़ा दराने विक्री करण्यात येत असल्याचेही मालमत्ता शाखेला समजले होते. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी आपल्या पथकासह न्यायालयांच्या बाहेर या टोळीवर लक्ष ठेवले होते. यातून काही जण बनावट कागदपत्रांची विक्री करत असल्याचे पोलिसांना आढळले. या पथकाने वांद्रे, किल्ला न्यायालय, अंधेरी भागातून त्या ९ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ७ लाख रुपये किमतीचे ३०० बनावट मुद्रांक, रबरी शिक्के, जुन्या तारखांचे शिक्के हस्तगत करत त्यांच्याविरूद्ध निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.