हजारो शेतकऱ्यांच्या घोषणांनी मुंबई दणाणली; राजकीय, सामाजिक संघटनांच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती

मुंबई : कृषी कायदा रद्द करण्यासाठी गेले दोन महिने पंजाब, हरियाणातील शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले असताना, महाराष्ट्रभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी मुंबई दणाणून सोडली. लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत आणि तरुणांपासून महिलांपर्यंत हजारोंच्या संख्येने आझाद मैदानात एकवटलेल्या आंदोलकांनी आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या या शक्तिप्रदर्शनाला राजकीय पक्ष, संघटना तसेच सामाजिक क्षेत्रातील मातब्बर मंडळींची साथ मिळाली.

‘शेतकरी आंदोलन झिंदाबाद’, ‘हम लढेंगे, हम जितेंगे’, ‘मोदी सरकार मुर्दाबाद’, ‘कृषी कायदा रद्द करा’ अशा घोषणा देत गेल्या दोन दिवसांपासून चालत येत असलेल्या शेतकऱ्यांचे जथ्येच्या जथ्ये रविवारी सायंकाळपासूनच आझाद मैदान परिसरात जमू लागले होते. या सोमवारी त्यात कित्येक पटीने भर पडली. आझाद मैदान आणि आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके चौक या शेतकऱ्यांच्या घोषणांनी दणाणून गेला.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून त्याला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी संघटना आणि सामाजिक संस्था सरसावल्या आहेत. या आंदोलनात शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी अनेक पक्षांचे नेतेही उपस्थित होते. विशेष म्हणजे यात महिला आणि वृद्धांची संख्या लक्षणीय होती. यातील अनेकांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आगपाखड केली. ‘मोदी सरकार आले तेव्हा अच्छे दिन येतील असे वाटले होते, पण आता हे सरकार शेतकऱ्यांनाच विकायला निघाले आहे’ अशी प्रतिक्रिया धुळ्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. ‘सध्या पिकवत असलेल्या पिकालाच पुरेसा दाम  मिळत नाही. हे कायदे लागू झाल्यावर तर सगळाच  मनमानी कारभार सुरू होईल. म्हणूनच या निर्णयाला विरोध आहे,’ असे धुळ्याहून आलेले चुन्नीलाल सोनावणे यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्य़ातील संगमनेर तालुक्यातून निघालेल्या मोर्चासोबत मथुराबाई बराडे मुंबईत दाखल झाल्या होत्या. गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी आझाद मैदानावरच ठिय्या दिला होता. अखिल भारतीय किसान संघर्ष सभेच्या वतीने २०१८ मध्ये नाशिक ते मुंबई काढलेल्या मोर्चातही त्या सहभागी झाल्या होत्या. ‘मागील सरकारने वनजमिनी नावावर करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची दोन्ही सरकारने अद्याप पूर्तता केली नाही. गावातील १०८ आदिवासी कुटुंबांचे वनजमीन मालकीसाठी अर्ज घेऊन आलो आहोत. आम्ही दोन-तीन पिढय़ांपासून या जमिनी कसत आहोत. जमिनीची मालकी मिळविणे आणि या शेतकरीविरोधी कायद्यांना विरोध करणे असा आमचा दुहेरी लढा आहे. हे कायदे लागू झाल्यास जमिनी मालकी मिळण्याआधीच आम्ही कंपन्यांच्या दावणीला बांधले जाऊ,’ अशी भीती मथुराबाईंनी व्यक्त के ली. कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी गावातील महिलांना घेऊन नऊ दिवस दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनातही त्या सहभागी झाल्या होत्या.

अशीच व्यथा पालघर जिल्ह्य़ातील सदाशिव दमाहडळ यांनी मांडली. ‘आम्ही वर्षांनुवर्षे मजूर म्हणून राबत आहोत. ज्या शेतात राबलो त्या शेताचे मालक होण्यासाठी आमचा संघर्ष आहे. ती जमीन आमच्या हक्काची आहे. आजवर झालेल्या शोषणाला आम्ही वैतागलो आहोत,’ असे ते म्हणाले, तर ‘चप्पल, बूट आणि गाडी यांसारखी उत्पादने विकून कंपन्या नफा कमावतात. तसा शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल हा नफा कमावून का विकता येऊ नये? आम्ही

शेतकरी आमचा माल तोटय़ात विकायला काबाडकष्ट करतो का? कायदे लागू केल्यावर काही दिवस कंपन्या चांगले पैसे देऊन माल खरेदी करतील. मात्र नंतर कमी भावात खरेदी करून ग्राहकांना चढय़ा भावाने विकून लूट करतील. यामुळे आमचा कंपन्यांवर विश्वास नाही,’ असे मत सोलापूर जिल्ह्य़ातून आलेल्या ६८ वर्षीय सिद्धाप्पा कलशेट्टी यांनी व्यक्त केले.

पोलिसांशी झटापट

सभा संपल्यानंतर राजभवनाच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके चौकात (धोबी तलाव) अडविले. पोलिसांनी चौकात सर्व बाजूंनी रस्तारोधक (बॅरिकेडिंग) केले होते. तसेच मोठा फौजफाटा तैनात ठेवला होता. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना  चौकात रोखण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी पोलिसांचे कडे तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न के ला. पोलिसांनी अडविल्याने संयुक्त शेतकरी मोर्चाच्या वतीने चौकातच सभा घेऊन मोर्चाची सांगता करण्यात आली.

शीख समुदायाचे अन्नछत्र

कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात शीख समुदाय आतापर्यंत अग्रेसर राहिला आहे. मुंबईतही शीख समुदायाने या आंदोलनाला मोठा हातभार लावला. आंदोलनासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. दादर येथील श्री गुरू सिंग सभा यांच्या वतीने तीन दिवस जेवण पुरविण्यात आले होते. ‘या देशात शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते हे दुर्दैव आहे. हे आंदोलन केवळ पंजाबमधील शेतकऱ्यांचे नाही तर देशातील शेतकऱ्यांचे आहे. त्यामुळे मुंबईत आलेल्या सर्व शेतकरी आणि कामगारांची जेवणाची व्यवस्था आम्ही केली. यासाठी जवळपास १५०० लोक कार्यरत आहेत. के वळ तीन दिवस नाही, तर तीन महिने आंदोलन सुरू राहिले तरी अविरत अन्नपुरवठय़ाचे काम सुरू ठेवू,’ असा निर्धार श्री गुरू सिंग सभेचे प्रतिनिधी गुरज्योत कीर यांनी व्यक्त के ला.