आठवडा बाजारातील बक्षिसाची सोडत लांबणीवर; आवक नसल्याने बाजार ओस

पालिकेच्या आठवडा बाजारातून प्लास्टिकच्या पिशव्या हद्दपार करण्यासाठी ‘प्लास्टिकची पिशवी टाळा आणि पैठणी जिंका’ ही योजना राबविण्यास सुरुवात केली होती. या योजनेची पहिली सोडत गुरुवार, १ जून रोजी काढून विजेत्या महिलेला पैठणी बहाल करण्यात येणार होती. मात्र शेतकऱ्यांच्या संपामुळे आठवडा बाजार भरलाच नाही. त्यामुळे आठवडा बाजारात एका हातात कापडी पिशवी आणि दुसऱ्या हातात कुपन घेऊन पैठणीकडे डोळे लावून उभ्या असलेल्या असंख्य महिलांचा हिरमोड झाला.

‘बी’ विभाग कार्यालयाने काही महिन्यांपूर्वी डोंगरीजवळील सॅण्डहर्स्ट रोड येथील सीताराम शेणॉय उद्यानाजवळ आणि डोंगरी मराठी शाळेसमोर पदपथावर आठवडा बाजार भरवण्यास सुरुवात केली. नाशिक जिल्हय़ातील विंचर गावातील शेतकरी किरण शिरसाट, समाधान चौधरी, नितीन लोणारी आणि कमलेश निकाळे आणि त्यांचे सहकारी शेतकरी नित्यनियमाने या आठवडा बाजारात ताज्या भाजीचा पुरवठा करीत आहेत.

या आठवडा बाजारात भाजीपाला आणि धान्य खरेदीकरण्यासाठी येणाऱ्या महिला सोबत प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन येत असल्याचे निदर्शनास आले होते. प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी ग्राहकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून अनेक वेळा विनंती करण्यात आली. परंतु त्याकडे ग्राहक दुर्लक्ष करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पालिकेच्या ‘बी’ विभाग कार्यालयातील साहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी आठवडा बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांकरिता ‘प्लास्टिकची पिशवी टाळा आणि पैठणी जिंका’ ही योजना जाहीर केली. कापडाची पिशवी घेऊन येणाऱ्या महिलांना कूपन देण्यात आली.

चार आठवडय़ानंतर सोडत काढून विजेत्या महिलेला पैठणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गुरुवार, १ जून रोजी सोडत काढून पैठणी देण्यात येणार होती. मात्र शेतकरी संपावर गेल्यामुळे परिस्थिती चिघळू लागली. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी गुरुवारी भाजीपाला घेऊन येऊ नये अशी सूचना केली. त्यामुळे कालच्या गुरुवारी आठवडा बाजार भरलाच नाही. परंतु सोडत काढून पैठणी देण्यात येणार असल्याचे कूपन मिळालेल्या महिलांना सांगण्यात आले होते. त्यामुळे गुरुवारचा दिवस उजाडताच अनेक महिला सोडत काढण्यात येणार या अपेक्षेने आठवडा बाजारात पोहोचल्या. पण शेतकऱ्यांच्या संपामुळे आठवडा बाजार भरणार नसल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आणि त्यांना घरची वाट धरावी लागली. आता शेतकऱ्यांचा संप मिटल्यानंतर भरणाऱ्या आठवडा बाजारात सोडत काढून विजेत्या महिलेला पैठणी देण्यात येणार आहे.

प्लास्टिक पिशवी टाळा आणि पैठणी जिंका’ या योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. महिला प्लास्टिकऐवजी कापडाच्या पिशव्यांचा वापर करू लागल्या आहेत. गुरुवारी पहिली सोडत काढून विजेत्या महिलेला पैठणी देण्यात येणार होती. परंतु शेतकऱ्यांच्या संपामुळे आठवडा बाजार भरला नाही. त्यामुळे पुढील आठवडा बाजारात सोडत काढून पैठणीचे वितरण करण्यात येईल.

उदयकुमार शिरुरकर, साहाय्यक आयुक्त, ‘बीविभाग कार्यालय