महाराष्ट्राप्रमाणेच तेलंगणातही पिता-पुत्र एकत्र मंत्रिमंडळात

संतोष प्रधान, लोकसत्ता

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांचे पुत्र आदित्य हे मंत्री अशी पिता-पुत्राची जोडी राज्याच्या इतिहासात प्रथमच झाली असली, तरी देशातील अशी सहावी जोडी ठरली. शेजारील तेलंगणातही वडील मुख्यमंत्री व त्यांचे पुत्र मंत्रिपदी आहेत.

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात आदित्य ठाकरे यांचा कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून समावेश झाल्याने टीका होऊ लागली. मंत्रिमंडळ म्हणजे ठाकरे घराण्याची कौटुंबिक मालमत्ता झाल्याचा आरोप होऊ लागला. राज्यात शंकरराव चव्हाण व अशोक चव्हाण या पिता-पुत्राने मुख्यमंत्रीपद भूषविले. वडील-मुलगा, काका-पुतणे, मामा-भाचे अशा एकाच घरात विविध पदे भूषविण्यात आली. पण ही पदे वेगवेगळ्या काळात भूषविली गेली. वडील मुख्यमंत्री व त्यांचे पुत्र मंत्री हा प्रकार राज्यात प्रथमच घडला. शेजारील तेलंगणात के. चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री तर त्यांचे पुत्र के. टी. रामाराव हे माहिती तंत्रज्ञान, पंचायत राज आणि ग्रामविकास खात्यांचे मंत्री आहेत. चंद्रशेखर राव यांचे भाचे हरीश राव हे अर्थमंत्री आहेत. म्हणजेच मुख्यमंत्री, त्यांचे पुत्र व भाचे अशी एकाच घरात सारी महत्त्वाची पदे आहेत. शेजारील आंध्र प्रदेशात एन. चंद्राबाबू नायडू हे मुख्यमंत्रिपदी असताना २०१७ ते २०१९ या काळात त्यांचे पुत्र नारा लोकेश यांनी माहिती तंत्रज्ञान, नगरविकास आणि नगरपालिका प्रशासन विभागांचे मंत्रिपद भूषविले होते.

तमिळनाडूत करुणानिधी हे मुख्यमंत्रिपदी असताना त्यांचे राजकीय उत्तराधिकारी आणि पुत्र एम. के. स्टॅलिन हे उपमुख्यमंत्री होते. पंजाबमध्ये अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल हे मुख्यमंत्रिपदी असताना त्यांचे पुत्र सुखबीरसिंग बादल हे उपमुख्यमंत्री होते. करुणानिधी आणि बांदल या दोन्ही नेत्यांनी आपल्या राजकीय उत्तराधिकाऱ्यांकडे मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद सोपविले होते. विशेष म्हणजे स्टॅलिन व सुखबीरसिंग या दोघांची मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा त्यांच्या वडिलांनी पूर्ण होऊ दिली नव्हती.

शेख अब्दुल्ला हे जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी असताना त्यांचे पुत्र डॉ. फारुक अब्दुल्ला हे आरोग्यमंत्री होते. हरयाणात देवीलाल हे मुख्यमंत्रिपदी असताना त्यांचे पुत्र रणजीतसिंह चौटाला हे त्यांच्याच मंत्रिमंडळात कृषिमंत्री होते.

वडील मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळात पुत्र मंत्री या आतापर्यंतच्या जोडय़ा

* उद्धव ठाकरे –             आदित्य ठाकरे  महाराष्ट्र

* के. चंद्रशेखर राव –     के. टी. रामराव तेलंगणा

* एन. चंद्राबाबू नायडू – नारा लोकेश     आंध्र प्रदेश

*’ एम. करुणानिधी –    एम के स्टॅलीन        तमिळनाडू

* शेख अब्दुल्ला –         डॉ. फारुख अब्दुल्ला      जम्मू आणि काश्मीर

* देवीलाल –                  रणजीतसिंह चौटाला      हरयाणा