दोन वर्षांपूर्वी शाळेतून  सहलीसाठी गेलेल्या मुलीचा अचानक मृत्यू झाला आणि आता ती परत येणार नाही, हे वसई येथे राहणाऱ्या रमेश पवार यांना चांगलेच ठाऊक आहे. मात्र हे सत्य माहीत असूनही आपल्या मुलीचा बुडून मृत्यू झाला की तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, या कोडय़ाचा उलगडा झालेला नाही. पोलिसांच्या तपासात हे उत्तर मिळू न शकल्याने ते जाणून घेण्यासाठी अखेर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु, गेल्या दीड वर्षांपासून न्यायालयात खेटा घालूनही त्यांना हे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
एकदा तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे, तर दुसऱ्या वेळेस तिचा अपघाती मृत्यू झाल्याचे अहवाल डॉक्टरांनी दिल्याने हे मृत्यू प्रकरण अधिकच गूढ झाले. न्यायालयाने स्थानिक पोलिसांकडून तपास काढून घेत तो गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिल्यानंतरही हे गूढ कायमच आहे. बुधवारच्या सुनावणीत न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठाने पोलीस अधीक्षकांनाच या प्रकरणाचा तपास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पवार यांची १३ वर्षांची मुलगी ऐश्वर्या २७ ऑगस्ट २०१० रोजी शाळेने वसईतील तुंगारेश्वर येथे नेलेल्या सहलीला गेली होती.
सुमारे दीडशे मुले या सहलीला गेली होती. मात्र तेथे इतर मुलींसोबत नदीत मौजमजा करण्यासाठी गेलेली ऐश्वर्या अचानक बेपत्ता झाली. दोन-तीन तासांनंतर घटनास्थळापासून बऱ्याच अंतरावर दगडांमध्ये तिचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह सापडला.
तिचा बुडून झाल्याचे सुरुवातीला मानण्यात आले. मात्र शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी या अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करून घेतला. मात्र, जे. जे. रुग्णालयाने या प्रकरणी दिलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार तिचा मृत्यू अपघातीच होता, असे स्पष्ट झाल्यावर अज्ञात इसमाविरुद्ध दाखल करण्यात आलेला खुनाचा गुन्हा मागे घेण्यात आला.
पोलिसांच्या अहवालानुसार, सहलीला गेलेली इतर मुले आणि शिक्षकवर्ग यांनी दिलेल्या जबाबाप्रमाणे ऐश्वर्याचा बुडून मृत्यू झाला. मात्र ऐश्वर्याचा बुडून मृत्यू झाला, तर घटनास्थळापासून बऱ्याच अंतरावर तिचा नग्नावस्थेतील मृतदेह कसा सापडला आणि तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा कशा आढळून आल्या, असे प्रश्न उपस्थित करीत पवार यांनी त्या मागील खरे कारण जाणून घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली.
परंतु न्यायालयातही पोलिसांनी ऐश्वर्याचा मृत्यू हा अपघाती असल्याचा दावा करून घटनास्थळीच्या परिस्थितीविषयी न्यायालयात माहिती दिली. मात्र दोन शवविच्छेदन अहवालात तफावत कशी काय येऊ शकते, असा मुद्दा उपस्थित करून न्यायालयाने प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे
अन्वेषण विभागाकडे दिला. या घटनेलाही आता बरेच महिने लोटले आहेत. तरीही पोलिसांकडून ऐश्वर्याच्या मृत्यूचे ठोस कारण सांगितले गेलेले नाही. बुधवारच्या सुनावणीत न्यायालयाने पोलिसांना शेवटची संधी देत पुढील सुनावणीच्या वेळेस पोलीस अधीक्षकांनीच अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत़