दोन नागरिकांसह पाच जण गंभीर जखमी
कल्याण पूर्वेत वालधुनी ते काटेमानिवली भागाला जोडणाऱ्या पुलाचा काही भाग शुक्रवारी रात्री अकरा वाजता अचानक कोसळला. या दुर्घटनेत तीन कामगार आणि दोन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.  
२००८ पासून वालधुनी ते काटेमानिवली उड्डाणपुलाचे बांधकाम कोनार्क इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराकडून सुरू आहे. शुक्रवारी रात्री अकरा वाजता या पुलाच्या काही भागांत स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. या वेळी अचानक पुलाला आधार देणारी पट्टी घसरल्याने पुलाचा एक टप्पा कोसळला. पूल कोसळण्यापूर्वीच आवाज येऊ लागल्याने तीन कामगार तेथून पळाले, पण कठडय़ावर उभे राहिल्याने ते जखमी झाले. तसेच पुलाच्या बाजूला असलेले दोन नागरिक गंभीर जखमी झाले. त्यांच्या बरगडय़ांना गंभीर इजा झाली आहे. सुभाष गायकवाड, संतोष गोडे, अजगर अली, अजय चौधरी, पिंटय़ा बोन्थेल अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींना रात्री पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात आणले असता तेथे जखमींचे एक्स-रे काढण्यासाठी तंत्रज्ञ उपस्थित नव्हता. एक्स-रे काढण्यासाठी रुग्णालयात एकच तंत्रज्ञ आहे.  
प्रशासनाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.     

– पुलाचे नाव- वालधुनी पूल
– प्रकल्प खर्च- १२ कोटी ७८ लाख
– कामाला सुरुवात-
सन २००८
– ठेकेदार- कोनार्क इन्फ्रास्ट्रक्चर कं. लि.