वारंवार सूचना देऊनही खासगी शुश्रूषा गृह (नर्सिग होम), रुग्णालये, दवाखाने सुरू न करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. करोनाच्या साथीच्या काळात नागरिकांना अन्य आजारांसाठी उपचार मिळणे अवघड झाल्यामुळे पालिका रुग्णालयांवरचा ताण वाढू लागला आहे. मात्र खासगी आरोग्य यंत्रणा साथ देत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘कोरोना कोविड १९’ या संसर्गजन्य आजाराच्या पाश्र्वभूमीवर मुंबईतील खासगी शुश्रूषा गृह व खासगी दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश पालिकेद्वारे दिल्यानंतरही अनेक ठिकाणी खासगी दवाखाने बंद आहेत. यामुळे नागरिकांना वैद्यकीय उपचार मिळण्यात अडथळे येत आहेत. जे खासगी शुश्रूषा गृह, रुग्णालये वा दवाखाने अद्याप सुरू झालेले नसतील, त्यांच्यावर पोलिसात गुन्हे नोंदविण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्याचबरोबर जी खाजगी रुग्णालये, शुश्रूषा गृहे, दवाखाने सुरू होतील, त्यांना पालिकेद्वारे ‘पीपीई’ देण्याचेही निर्देशआयुक्तांनी दिले. खासगी रुग्णालये, नर्सिग होम, खाजगी दवाखान्यांना प्रथम विनंती, नंतर सूचना व नोटीसाही देण्यात आल्या. मात्र, आता पालिकेने थेट कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.