कामाला वेग येणार

मुंबई : गेल्या सुमारे दोन वर्षांपासून रखडलेल्या हँकॉक पुलाच्या कामाला आता गती मिळणार आहे. रेल्वेच्या हद्दीत गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली असून रेल्वेच्या हद्दीतील जागेत बांधकाम करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयोगाला (सीआरएस)ने देखील अंतिम मंजुरी नुकतीच दिली आहे. त्यामुळे रेल्वेच्या हद्दीतील पुलाचे कामही आता लवकरच वेग घेणार आहे.

‘लोकसत्ता मुंबई’ने १६ जानेवारीच्या अंकात ‘रेल्वेच्या ना हरकतीअभावी हँकॉक पुलाचे काम रखडले’ या मथळ्याखाली दिलेल्या वृत्ताचा खुलासा करताना रेल्वेने ही माहिती दिली.

माझगाव येथील बहुचर्चित हँकॉक पुलाची पुनर्बाधणी गेल्या दोन वर्षांपासून रखडली होती. सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील हँकॉक ब्रिज धोकादायक ठरवून जानेवारी २०१६ मध्ये मध्य रेल्वेने पाडून टाकला. त्यामुळे येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. ट्रॅक ओलांडताना अपघातांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे हा पूल लवकर बांधावा अशी मागणी जोर धरू लागली होती. फेब्रुवारी २०१८ मध्ये या पुलाचे काम सुरू झाले. पण या कामामध्ये जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या, रेल्वेच्या जागेतील अतिक्रमण आदी अडथळे आल्यामुळे कामाला वेग येत नव्हता.  महापालिकेने पूल उभारणीची अंतिम योजना ९ डिसेंबर २०१९ रोजी रेल्वेकडे सादर केली. ती १६ डिसेंबरला मंजूर करण्यात आली.

मात्र आता रेल्वेच्या जागेतील ३९ बांधकामांचे एप्रिल २०१९ मध्ये पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूस १७ पाइल्सचे काम करण्यात आले. रेल्वे मार्गावरील स्ट्रील गर्डरचे काम चंडिगड येथील फॅक्टरीत पूर्ण झाले आहे. हा लोखंडी गर्डर रेल्वे मार्गावर टाकण्यासाठी मध्य रेल्वेच्या पूल विभागाशी पालिकेने पत्रव्यवहार केला.  रेल्वेच्या प्रमुख अभियंत्यांनी या कामाला मंजुरी दिली आहे. त्यानंतर हा प्रस्ताव रेल्वे सुरक्षा आयोग यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. त्यानुसार १६ जानेवारीला ही अंतिम मंजुरीही देण्यात आली असून मंजुरी दिल्याचे पत्रही महापालिकेला पाठवण्यात आले असल्याचे मध्य रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.