विद्यापीठाच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या नियमित परीक्षांबरोबरच राहिलेल्या विषयांच्या परीक्षाही विद्यार्थ्यांना जुलैमध्ये देता येणार आहेत. विद्यापीठाने परीक्षांबाबत मार्गदर्शक सूचना महाविद्यालयांना दिल्या आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या किंवा अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा या जुलै महिन्यात घेण्यात येतील. तसेच अंतिम वर्षांच्या अंतिम सत्रासाठी प्रविष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांच्या पूर्वीच्या सत्रातील राहिलेल्या विषयांच्या म्हणजेच एटीकेटीच्या परीक्षा यासुद्धा जुलै महिन्यातच घेण्यात येणार आहेत. या परीक्षा १३ मार्चपर्यंत शिकविण्यात आलेल्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात येतील. टाळेबंदीचा कालावधी हा विद्यार्थ्यांचा उपस्थिती कालावधी म्हणून ग्राह्य़ धरण्यात येणार आहे. या सर्व परीक्षा आणि दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेच्या परीक्षांबाबत स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.