महाड औद्योगिक वसाहतीमधील ओंकार केमिकल्स अँड बल्क ड्रग हा कारखाना आज (रविवारी) पहाटे लागलेल्या आगीत भस्मसात झाला. पहाटे साडेतीन पावणे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीचे नेमके कारण समजले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आग लागली त्यावेळेस या कारखान्याच्या मालकासह तीन कामगार कारखान्यात होते. रसायनांचा साठा असल्याने काही समजायच्या आतच आगीने उग्र स्वरूप धारण करत संपूर्ण कारखाना आपल्या लपेट्यात घेतला. मालक आणि तिन्ही कामगारांनी प्रसंगावधान राखीत बाहेर पळ काढल्याने ते बचावले. रसायनांचे ड्रम पेटून त्यातून स्फोटांसारखे आवाज येऊ लागल्याने त्या आवाजाने आजूबाजूच्या कारखान्यांच्या खिडक्यांची तावदाने फुटली.
आगीची माहिती मिळताच महाड एमआयडीसीचे दोन आणि महाड नगरपालिकेचा एक बंब त्वरीत घटनास्थळी पाठविण्यात आला. या भागातील वीज पुरवठा देखील बंद करण्यात आला. सुमारे दोन अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत कारखान्याच्या इमारतीसह सर्व यंत्रसामुग्री आणि रसायनांचा साठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सस्ते आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी मोलाची कामगिरी बजावली.