देशात आणि राज्यात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. त्यातच रोज करोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, आज शिवाजी पार्क परिसरात करोनाचा पहिला रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे.

शिवाजी पार्क परिसरात राहणाऱ्या एका ६० वर्षीय व्यक्तील करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या घशातील द्रवाचे नमूने चाचणीसाठी पाठवले असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना सध्या मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, ते राहत असलेली इमारत आणि नजीकचा परिसर मुंबई महानगपालिकेनं पोलिसांच्या मदतीनं सील केला आहे. तसंच या परिसराचं पालिकेकडून निर्जंतुकीकरणही करण्यात आलं.

राज्यातील आकडा वाढला
महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ४७ ने वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता ५३७ करोनाग्रस्त आहेत. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. या ४७ रुग्णांपैकी ४३ रुग्ण मुंबई आणि ठाण्यातले आहेत. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. २८ पॉझिटिव्ह रुग्ण मुंबईत तर १५ पॉझिटिव्ह रुग्ण ठाण्यात सापडले आहेत. अमरावतीत १ रुग्ण, २ पुण्यात, तर पिंपरीत १ रुग्ण सापडला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ५३७ वर गेली आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत ही संख्या ४९० होती. आता ही संख्या ५३७ झाली आहे.