मिरा रोड येथील पूजा नगर परिसरात राहणाऱ्या एका ५० वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर शहरात आज एकाच दिवशी पाच नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मिरा भाईंदर शहरातील रुग्णांची एकूण संख्या आता २२ झाली आहे.

मिरा भाईंदर शहरातील करोनाबाधित रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे आढळून येत आहे. मंगळवारी ५ नवीन रुग्ण समोर आल्याने शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता २२ एवढी झाली आहे. दरम्यान, मिरा रोड येथील ५० वर्षीय करोनाबाधित व्यक्तीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हा मिरा भाईंदर शहरातील करोनाचा पहिला बळी ठरला आहे. मंगळवारी आढळून आलेल्या ५ रुग्णांमध्ये ४ पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहेत. हे रुग्ण गोडदेव, आदर्श शाळा आणि पूजा नगर अशा नव्या परिसरात राहणारे आहेत.

मिरा भाईंदरमध्ये ८७३ नागरिक हे परदेशात आले असून यांपैकी ५५४ नागरिकांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर ३१९ नागरिकांना १४ दिवसांच्या तपासणीनंतर घरी सोडण्यात आले आहे. त्याचप्रकारे ४५० नागरिकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा तपास सुरु असल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली.