दीड वर्षांच्या मुलाचा मृत्यू

राज्यभरात स्वाइन फ्लूने धुमाकूळ घातला असताना आता मुंबईत स्वाइन फ्लूची बाधा झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण अवघा दीड वर्षांचा असून वर्षभरातील हा पहिला रुग्ण आहे. त्याला भायखळा येथील दाऊद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

१ जानेवारी ते ३० एप्रिलपर्यंत राज्यभरात ५०० हून अधिक स्वाइन फ्लूचे रुग्ण सापडले होते. यात १००हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून ही संख्या पुणे व नागपूरमध्ये सर्वाधिक आहे, तर मुंबईत या वर्षांत स्वाइन फ्लूचे २१ रुग्ण दाखल झाले असून त्यांतील एक रुग्ण २८ एप्रिल रोजी दगावला आहे. मृत्यू झालेला मुलगा अवघा दीड वर्षांचा असून वरळी येथील आंबेडकरनगर येथे तो राहत होता.

त्याच्या मृत्यूनंतर पालिकेने येथील स्थानिकांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. या दीड वर्षांच्या मुलाला ११ एप्रिलपासून उलटय़ा, ताप हा त्रास होत होता. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी त्याला १८ एप्रिल रोजी भायखळा येथील दाऊद रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्याची प्रकृती खालावत होती. त्यामुळे त्याला २१ एप्रिल रोजी नूर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे त्याची प्रकृती अधिक खालावली. यामुळे त्याला व्हेंटिलेटरचा आधार देऊन २५ एप्रिलला कस्तुरबा रुग्णालयात रात्री १२.३० च्या दरम्यान आणण्यात आले. मात्र तीन दिवसांनी २८ एप्रिल रोजी दुपारी १२च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घ्यावयाची काळजी

  • खोकला व सर्दी झाल्यास तोंडावर रुमाल ठेवा.
  • आजारी व्यक्तीच्या संपर्कात फार काळ राहू नका.
  • व्यवस्थित झोप घ्या.
  • द्रवपदार्थाचे जास्तीत जास्त सेवन करा. पौष्टिक आहार घ्या.
  • गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा.
  • घरातील हवा मोकळी राहील याची दक्षता घ्या.

गेल्या चार महिन्यांत पालिकेने ३ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी केली असून ७६५ घरांमध्ये जाऊन स्वाइन फ्लू होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक मार्गदर्शन केले आहे. मुंबईत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या परिसरात तपासणी करण्यात आली असून त्यात कुणालाही स्वाइन फ्लूची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.