माशांची प्रजननस्थळे नष्ट, मासे सुकवण्याची जागा पाण्याखाली
मालाड पश्चिमेकडील मालवणी कोळीवाडा परिसरातील खाडीमुखाशी असलेल्या दोन हेक्टर जागेवर नौदलाने टाकलेल्या १५ फूट उंचीच्या भरावामुळे खाडीचे अध्र्याहून अधिक पात्र बुजवले गेले आहे. यामुळे या भागातील माशांची प्रजननस्थळे पूर्णपणे नष्ट झाली असून याचा परिणाम येथील मासेमारीवर होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे, नौदलाच्या भरावामुळे मच्छिमारांच्या मासे सुकवण्याच्या जागेत भरतीच्या वेळी खाडीचे पाणी शिरू लागल्याने त्यांची कोंडी झाली आहे. गेल्या चार महिन्यांपासून याप्रकरणी नौदलाशी संवाद साधण्याचा प्रयत्न स्थानिक मच्छिमारांनी केला. परंतु, नौदलाने त्यांना दाद दिलेली नाही.
मालवणी येथील कोळीवाडय़ाच्या मच्छिमार संघटनेत ८३२ सभासद आहेत. या सभासदांकडे एकूण चारशे यांत्रिक होडय़ा आणि तितक्याच लहान होडय़ा आहेत. या होडय़ांच्या साह्याने हे मच्छिमार जवळपासच्या समुद्रात मासेमारी करतात. बोंबील, जवळा, कोळंबी हे मासे पकडून तसेच सुकवून त्यांची विक्री केली जाते. त्यासाठी खाडीकिनाऱ्याचा वापर केला जातो. मात्र, नौदलाच्या भरावामुळे या जागेत आता पाणी शिरू लागले आहे.मालवणी येथे आयएनएस हमला या नौदलाच्या कार्यालयाकडून जवळच असलेल्या भागात जानेवारीपासून नौदलाने भराव टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे खाडी बुजत आहे. परिणामी भरतीचे पाणी आता किनाऱ्यावर शिरू लागले आहे.
खाडीच्या भागात मासे अंडी घालायला येतात. शिवाय मोठी कोळंबी, शिंगाडा हेदेखील खाडीच्या पाण्यातच राहतात. गेल्या काही वर्षांत माशांचे प्रमाण कमी होत असल्याने मच्छीमार आधीच घायकुतीला आले आहेत. आता तर खाडीतच भराव आला, तर माशांची पैदास होणार कशी असा प्रश्न मुंबई जिल्हा मच्छीमार कृती समितीच्या उज्ज्वला पाटील यांनी मांडला. नौदलाचा विषय केंद्राच्या पातळीवर असल्याने मच्छीमारांनी स्थानिक खासदारांशी संपर्क साधला. उपनगर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पर्यावरणाच्या कायद्याला बगल देत नौदलाकडून सुरू असलेल्या या कारवाईबद्दल खासदार गोपाळ शेट्टी यांनी माहिती दिली व सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे नौदलाने आता काम थांबवले आहे. दरम्यान, भराव टाकण्याचे काम नौदलाच्या जागेत सुरू असून त्याचा परिसरातील पर्यावरणावर परिणाम होणार नाही, असा दावा जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केला.
दरम्यान, नौदलाने संरक्षण सज्जतेसाठी नाही, तर नौसैनिकांच्या मुलाबाळांना खेळण्याची जागा उपलब्ध करण्यासाठी हा भराव टाकला आहे. त्यामुळे हा भराव लवकरात लवकर हटवून मच्छीमारांना त्यांच्या उपजीविकेचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली.

रात्रंदिवस शेकडो टेम्पो रांगेत येऊन हा भराव
टाकत होते. डोळ्यांसमोर खाडी बुजवली जात असल्याने आम्ही घाबरलो. त्यांना दूरध्वनी केले, आयएनएस हमलातील अधिकाऱ्यांना भेटायचा प्रयत्न केला. पण त्यांनी आम्हाला उडवून लावले. त्यामुळे मग पत्रव्यवहाराला सुरुवात केली.
– हेमंत कोळी, मालवणी मच्छीमार
विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष

‘गुगल मॅप’वरून घेतलेले मालवणी कोळीवाडा परिसरातील खाडीकिनाऱ्याचे हे काही महिन्यांपूर्वीचे हे छायाचित्र. या परिसरातील चौकटीत दाखवण्यात आलेल्या भागावर नौदलाकडून भराव टाकण्यात आला आहे. तसेच खाडीचा निमुळता होत चाललेला भागदेखील या भरावाखाली गेल्याने येथील जैवविविधता धोक्यात आली आहे.
प्राजक्ता कासले,