बंदरावर मात्र सर्रास थर्माकोल खोक्यांचा वापर

राज्य सरकारच्या प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी सरकारी पातळीवर आणि सामान्यांच्या पातळीवरही संथपणे सुरू असली तरी काही मासळी बाजारांनी मात्र त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली असून मत्स्यप्रेमींना कागदात बांधलेले मासे घ्यावे लागत आहेत!  ज्यांना कागदात मासे नको असतील, त्यांना घरून डबा आणण्यास विक्रेते सांगत आहेत. मुंबई बंदरात मात्र मासे वाहून नेण्यासाठी थर्माकोलच्याच खोक्यांचा वापर सर्रास सुरू आहे. तसेच चिकन आणि मटणची विक्रीही प्लास्टिक पिशव्यांतून अनेक ठिकाणी सुरू आहे.

प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्षात त्याची काटेकोर अंमलबाजवणी अपेक्षित होती, मात्र अजूनही बाजारांमध्ये संमिश्र प्रतिसाद आहे. महापालिका आणि पोलिसांनी कारवाईला सुरुवात केल्यानंतर अंमलबजावणी करू असे, काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सर्वसामान्यांच्या घरातील प्लास्टिक वस्तूंच्या विल्हेवाटीसाठी खास केंद्रे उघडण्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली होती. प्रत्यक्षात बंदी लागू होऊन पंधरवडा उलटत असला तरी अशा एकाही केंद्राची घोषणादेखील झालेली नाही. त्यामुळे सरकारही बंदीबाबत कितपत गंभीर आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मात्र दंडाच्या भीतीपायी प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कागदी पिशव्यांचा किंवा केवळ कागदाचा मोठय़ा प्रमाणात वापर सुरू झाला आहे. भाजी, फळे, कडधान्य विक्रेत्यांना कागदी पिशव्यांचा आधार मिळाला असल्याने त्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र मासळी आणि मटण बाजारातील काळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी आल्याने त्याला पर्याय शोधण्याच्या प्रयत्न करताना विक्रेते पेचात पडले आहेत.

कागदी पिशव्यांमधून मासे भरून देणे शक्य असले तरी, ग्राहक ते स्वीकारत नसल्याची माहिती चुनाभट्टी पूर्वेकडील मासळी बाजारातील एका मासळी विक्रेत्या महिलेने दिली. काही बाजारांत विक्रेते ग्राहकांना घरूनच भांडे आणण्यास सांगत आहेत. वडाळा पश्चिम येथील मासळी बाजारातील नियमित ग्राहकांनी घरूनच भांडे घेऊन जाण्यास सुरुवात केली आहे. प्लास्टिकबंदीच्या निर्णयाचा अप्रत्यक्ष फटका मासे विक्रीला बसला असला तरी त्याची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे मासळी विक्रेत्या गीता नाखवा यांनी सांगितले.

लालबाग, कफ परेड, माहीम येथील मासळी बाजारांमध्ये प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबाजावणी होताना दिसत नाही. तसेच चिकन-मटण विक्रेत्यांनी देखील या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केलेली नाही. चिकन-मटण विक्रीचे प्रमाण अधिक असल्याने ते कागदाच्या पिशवीत भरून देणे शक्य नाही. योग्य पर्याय उपलब्ध होईपर्यंत प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबाजवणी शक्य नसल्याचे लालबाग येथील एका मटण विक्रेत्याने सांगितले.