प्रक्रिया थंडावली; निर्यातीत १० ते २० टक्के घट

सुहास जोशी, मुंबई</strong>

अरबी समुद्रातील चार चक्रीवादळे आणि सतत कमी दाबाच्या प्रभावी क्षेत्रांमुळे राज्यातील मत्स्य उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. जून आणि जुलै हा मासेमारी बंदीचा कालावधी संपल्यानंतरदेखील अरबी समुद्रातील परिस्थिती मासेमारीसाठी पूरक नसल्याने प्रक्रिया उद्योग थंडावला असून निर्यातीत १० ते २० टक्क्यांची घट झाली आहे.

‘सर्वसाधारणपणे ऑगस्ट ते डिसेंबर या काळात व्यवसायासाठी उपयुक्त मासळी मिळते. त्यातून वर्षभराचा खर्च निघतो. मात्र यंदा या काळात मासेमारीवर अनेक संकटे होती. त्यामुळे मागणीच्या केवळ २० टक्केच तारली आणि इतर मासळी मिळत होत आहे,’ असे प्रक्रिया उद्योजक विजय नाखवा यांनी सांगितले.  रत्नागिरी, कुडाळ, तळोजा या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रक्रिया उद्योग करणाऱ्या काही फिश मिल आहेत. यापूर्वी तारली मासे पकडण्याचे प्रमाण आपल्याकडे तुलनेने कमी होते. त्यामुळे हा प्रक्रिया उद्योग मंगळूर येथे अधिक विस्तारला. पण गेल्या काही वर्षांत राज्यातही असे उद्योग सुरू झाल्याचे नाखवा यांनी सांगितले. यंदा समुद्रातील बदलांमुळे या उद्योगाला धक्का बसला असून, नव्याने या व्यवसायात उतरणाऱ्यांना मोठय़ा नुकसानास सामोरे जावे लागत असल्याचे राज्य मच्छीमार सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांनी सांगितले.  पावसाळ्यात दोन महिने मासेमारीवर बंदी असते. त्यानंतर ऑगस्टपासून मासेमारीचा हंगाम सुरू होतो. पण यंदा पावसाळा जुलैमध्ये सुरू झाला. त्यानंतर अरबी समुद्रात सतत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले.

निर्यातस्थिती..  युरोपातील मत्स्यनिर्यातीत राज्याचा वाटा सर्वाधिक आहे. एका हंगामात महाराष्ट्रातून दीड लाख मेट्रिक टन (सुमारे ४९०० कोटी रुपयांचे) मासे निर्यात होतात. पण समुद्रातील बदलत्या परिस्थितीमुळे मासे निर्यात बाजाराचे चित्र बदलले. निर्यातीत १० ते २० टक्क्यांची घट झाल्याचे मत्स्य व्यवसायातील तज्ज्ञांनी सांगितले. बांगडय़ासारखे मासे स्थानिक बाजारात महागल्यामुळे निर्यातीच्या दराशी स्पर्धा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे निर्यातीतील नफाही कमी होत असल्याचे सांगितले जात आहे.

झाले काय?

माशांपासून तेल आणि पावडर तयार करणाऱ्या प्रक्रिया उद्योगांना राज्यात ‘फिश मिल’ म्हणून ओळखले जाते. कुक्कुटपालन, मत्स्यशेती आणि औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये मत्स्य उत्पादनांचा वापर होतो. यंदा वायू, इका, क्यार आणि माहा या चक्रीवादळांमुळे या उद्योगास फटका बसला आहे.