नव्या निकषानुसार वयात १५ दिवसांची शिथिलता

मुंबई : पहिलीच्या प्रवेशासाठी कागदोपत्री सहा वर्षे वयाची अट असली तरी आता प्रत्यक्षात साडेपाच वर्षांच्या मुलांनाच प्रवेश मिळणार आहे. प्रवेशासाठी १५ ऑक्टोबपर्यंतचे वय ग्राह्य़ धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शाळेच्या वेळा, अभ्यासक्रम यांमुळे विद्यार्थ्यांवर येणाऱ्या ताणाच्या पाश्र्वभूमीवर कोणत्या इयत्तेत प्रवेश देण्यासाठी मुलांचे वय किती असावे याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पूर्वप्राथमिकसाठी तिसऱ्या वर्षांपासून प्रवेश देण्याची अट २०१० मध्ये निश्चित करण्यात आली. त्याचप्रमाणे पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षांची अट निश्चित करण्यात आली होती. मात्र २०१० पासून टप्प्याटप्प्याने दरवर्षी वयाचा निकष बदलण्यात आला. त्यानुसार यंदापासून सहा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांलाच पहिलीला प्रवेश देता येणार आहे. सुरुवातीला ३१ जुलैपर्यंतचे वय गृहीत धरण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र त्यानंतर ३१ जुलैनंतर जन्माला येणाऱ्या मुलांचे एका वर्षांचे नुकसान होत असल्याचा आक्षेप पालकांनी घेतला होता. त्यामुळे २०१७ मध्ये वय ग्राह्य़ धरण्याची मुदत ३० सप्टेंबपर्यंत वाढवण्यात आली. त्यात आता आणखी पंधरा दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे.

निर्णय काय?

हाती पेन, पेन्सिल धरणे, लिहिणे या कौशल्यांबरोबरच आकलनक्षमता विकसित होण्यापूर्वीच मुलांना शाळेत दाखल करण्यात येत असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय ग्राह्य़ धरण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. आता १५ ऑक्टोबपर्यंत वयाची सहा वर्षे पूर्ण होणाऱ्या मुलांना पहिलीला प्रवेश देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय मुख्याध्यापकांनी त्यांच्या पातळीवर घ्यायचा आहे.