06 August 2020

News Flash

पाचवीच्या कवितांना ‘स्वरसाज’

हीच अवस्था बहिणाबाईंच्या ‘अरे खोप्यामधी खोपा..’ ऐकतानाही होते.

‘जन पळभर म्हणतील हाय हाय..’ जीवनाच्या क्षणभंगुरतेविषयी कवी भा.रा. तांबे यांनी शब्दबद्ध केलेली कविता जेव्हा आपण तितक्याच गोड चालीत ऐकतो तेव्हा ती गुणगुणण्याबरोबर तिचा गंभीर भावार्थही आपले मन नकळत चिरत जातो. हीच अवस्था बहिणाबाईंच्या ‘अरे खोप्यामधी खोपा..’ ऐकतानाही होते. पाठय़पुस्तकात असलेल्या या कविता किंवा गाणी नादमधुर चालीत ऐकली की ती अधिकच भावतात. ती पाठ तर होतातच, पण शब्दांबरोबरच त्यातला भावार्थही आपल्या मनात कायमचा कोरला जातो. हीच गोष्ट लक्षात घेत मराठीच्या पाठय़पुस्तकातील इयत्ता पाचवीला असलेल्या कवितांना स्वरांचा सुंदर साज चढविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या कविता विद्यार्थ्यांनी गुणगुणाव्यात, त्या अधिक आनंददायी वातावरणात शिक्षकांनाही शिकविता याव्यात यासाठी मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी ही संकल्पना राबविण्याचे ठरविले. त्यांच्या या प्रयत्नांना साधना सरगम, केतकी माटेगावकर, सचिन खेडेकर, ऊर्मिला धनगर, नंदेश उमप, शाल्मली सुखटणकर, प्रवीण डोणे, विभावरी आपटे आदी प्रथितयश गायिका-गायकांची साथ लाभली. राहुल रानडे, संभाजी भगत, कमलेश भडकमकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या कविता लवकरच विद्यार्थी-शिक्षकांना ‘कवितांच्या गावी’ घेऊन जाण्यास येणार आहे. विद्यार्थ्यांच्या आणि कवितांच्या प्रेमापोटी हे सर्व मान्यवर या उपक्रमाशी जोडले गेले. यापैकी कुणीही एका पैशाचे मानधन न घेता हा उपक्रम पूर्णत्वाला नेला आहे, असे बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.
या सर्वाच्या प्रयत्नातून आकाराला आलेल्या ‘सूर कवितांचे’ या ध्वनिफितीचे प्रकाशन येत्या २० ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. पाचवीतील माय मराठी, कापणी, सण, पुस्तके, वल्हवा रे नाव, रंग जादूचे, वासरू अशा अनेक सुंदर सूरबद्ध कविता या ध्वनिफितीच्या माध्यमातून ऐकता येतील. सर्व गायक कार्यक्रमादरम्यान या कवितांचे सादरीकरण करणार आहेत. या शिवाय विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यापर्यंत या कविता पोहोचाव्यात यासाठी शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरही मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
२०१५-१६ या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता पाचवीचे बालभारतीचे पाठय़पुस्तक बदलण्यात आले. पुढील पाच वर्षे हाच अभ्यासक्रम असल्याने आम्ही या पाठय़पुस्तकातील कविता या उपक्रमाकरिता निवडल्या, असे चव्हाण यांनी सांगितले. सकाळी ११ वाजता राजा शिवाजी विद्यालयाच्या बी. एन. वैद्य सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. या वेळी माजी साहित्य संमेलन अध्यक्ष उत्तम कांबळे आणि अभिनेते सचिन खेडेकर विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2015 12:30 am

Web Title: five best poems
टॅग Poet
Next Stories
1 सानुग्रह अनुदान नाकारल्यास २५ ऑक्टोबरपासून ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांचा संप
2 आम्ही नाही, तुम्हीच बाहेर पडा!
3 लोकलमध्येच प्रसूती
Just Now!
X