कुलाब्यात हॉटेलसाठी जागा दाखवून एका व्यावसायिकाकडून पाच कोटी रुपये उकळणाऱ्या दलालाला अटक करण्यात शिवडी पोलिसांना यश आले आहे. युनुस मणियार असे या इसमाचे नाव आहे. तक्रारदार मोहम्मद र्मचट यांचा रे रोड येथील दारूखानाजवळ वजनकाटा व्यवसाय आहे. र्मचट यांना कुलाबा परिसरात हॉटेलसाठी जागा हवी होती. त्यांच्याकडे येणाऱ्या अजगर शेखला त्यांनी याबाबत सांगितले होते. शेख यांनी युनुस याची इस्टेट एजंट म्हणून ओळख करून दिली. कुलाबा येथे हॉटेलसाठी मोक्याच्या ठिकाणी ११ कोटी किमतीची जागा असल्याचे सांगितले. अखेरीस साडेआठ कोटींचा सौदा ठरला. त्यातील पाच कोटी रुपये र्मचट यांनी धनादेशाद्वारे मणियारला दिले. मात्र जागेचा ताबा मिळविण्यासाठी र्मचट यांना सहा वर्षे लागले. अखेरीस शिवडीचे पोलीस निरीक्षक अनिल सार्दळ यांनी गुन्हा दाखल करून मणियारला अटक केली.