मुंब्रा येथील शिक्षकासह तीन अटकेत, आठ विद्यार्थ्यांवर कारवाई

दहावीच्या सामाजिक शास्त्र विषयाची प्रश्नपत्रिकाफोडून विद्यार्थ्यांना विकणाऱ्या मुंब्रा-यातील शिक्षकासह एकूण ११ जणांना अंबोली पोलिसांनी अवघ्या दहा तासांमध्ये बेडय़ा ठोकल्या. गुन्हेगारी पाश्र्वभुमी असलेल्या मात्र पेशाने शिक्षक असलेल्या फिरोज अब्दुल मजीद खान(४७) याने सामाजिक शास्त्रासह दहावीच्या तब्बल पाच प्रश्नपत्रिकाफोडून विकल्याची धक्कादायक बाब अंबोली पोलिसांच्या चौकशीतून उघड झाली आहे.

फिरोज अंबरनाथचा रहिवासी असून मुंब्रा येथील किड्स पॅराडाईज शाळेत गणिताचा शिक्षक आहे. अंबरनाथमध्ये तो ब्रीलीयन्ट क्लासेस या नावाने खासगी शिकवणी चालवतो. किड्स पॅराडाईज शाळेत दहावीचे परीक्षा केंद्र असून मंडळाकडून आलेल्या सीलबंद प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्याची मुख्य जबाबदारी त्याच्यावर होती. केंद्रावर आलेल्या प्रश्नपत्रिकांच्या गठ्ठयाचे सील परीक्षेच्या अर्धातास आधी म्हणजे सकाळी १०.३० वाजता दोन विद्यार्थ्यांसमोर उघडणे बंधनकारक आहे. मात्र ही प्रक्रिया किड्स पॅराडाईज शाळेत पाळली जात नव्हती. त्यातच केंद्रप्रमुख असलेला फिरोज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अवैधरित्या प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा उघडत असे. त्यानंतर मोबाइलवर फोटो घेऊन त्याच्या खासगी शिकवणीतील एका शिक्षकाला, मुंबईच्या कामाठीपुरा येथील अन्वर हसनश्र अजरूल हसन शेख(२१) आणि इम्रान शेख(४५) अशा तिघांना पाठवत असे. अशापद्धतीने त्याने सामाजिक शास्त्रासह विज्ञान आणि गणित विषयाचे प्रत्येकी दोन म्हणजे एकूण पाच प्रश्नपत्रिकाफोडल्या. अन्वरच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकामुंबईतील अनेक विद्यार्थ्यांना इन्स्टाग्राम, वॉट्सअ‍ॅप अशा समाजमाध्यमांवरून मिळत असत.

अंधेरीच्या स्वामी मुक्तानंद शाळेतील शिक्षिका आणि परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षिका संध्या विलास पवार यांच्या सतर्कतेमुळे प्रश्नपत्रिकाचोरून विकणाऱ्या फिरोज आणि त्याच्या टोळीचे बींग फुटले. १९ मार्चला दहावीच्या समाजशास्त्र विषयाची परीक्षा होती.

परीक्षेआधी तीन विद्यार्थी मोबाइलमध्ये पाहून पुस्तक चाळताना पवार यांना आढळले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पवार यांनी हटकले. तिघांपैकी एका विद्यार्थ्यांचा मोबाइल हिसकावून पाहिला असता त्यावर समाजशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिकाआढळली. परीक्षा दिल्यानंतर या विद्यार्थ्यांकडे शाळेतील वरिष्ठांनी चौकशी केल्यावर ही प्रश्नपत्रिकाएका मित्राने इन्स्टाग्रामवरील निवडक मित्रांच्या समुहावर दिल्याची बाब पुढे आली. विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर सापडलेली आणि मंडळाकडून केंद्रावर आलेली प्रश्नपित्रका सारखीच असल्याने शाळेने तातडीने अंबोली पोलिसांना बोलावून हकिगत सांगितली.

पोलीस ठाण्यात येताच फिरोजने आपला गुन्हा कबूल केला. चौकशीत फिरोजने आतापर्यत पाच प्रश्नपत्रिकाफोडून विकल्याचे कबूल केले.

दोन हजारांमध्ये विक्री

पैसे कमावण्यासोबत स्वत:च्या खासगी शिकवणीचे नाव मोठे व्हावे हा फिरोजचा मुख्य उद्देश होता. म्हणून त्याने वेळेआधी प्रश्नपत्रिकांचे फोटो काढून आधी शिकवणीत शिकणाऱ्या ३१ मुलांना पोहोचवण्याची व्यवस्था केली. अन्वर, इम्रान या साथीदारांच्या मदतीने त्याने प्रश्नपत्रिकांची दोन ते तीन हजार रुपयांमध्ये सर्वत्र विक्री केली.

विज्ञानाची प्रश्नपत्रिका जानेवारीतच फुटली?

एका वृत्तपत्रात सराव चाचणी म्हणून आलेली विज्ञान प्रश्नपत्रिका जवळपास जशीच्या तशी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटीचा प्रकार दोन महिन्यांपासून सूरू होता की वृत्तपत्रात आलेली प्रश्नपत्रिका तशीच वापरण्यात आली असे प्रश्न उपस्थित होत आहेत.