पर्यटनवृद्धी आणि पर्यटनाचा एकत्रित प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ राज्याच्या सीमेवरील गुजरात, तेलंगणा, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश आदी पाच राज्यांसोबत करार करणार आहे. मुंबईत सुरू असलेल्या मेक इन इंडिया सप्ताहात या कराराची घोषणा होणार असून, एप्रिलमध्ये हा करार प्रत्यक्षात करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.
राज्यात गेल्या वर्षी ४० लाख परदेशी तर जवळपास ८ कोटी देशी पर्यटकांनी पर्यटनस्थळांना भेटी दिल्या आहेत. देशांतर्गत पर्यटकांची संख्याही मोठी असून ही संख्या अजून वाढावी यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. तसेच, परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याचा उपक्रमही आम्ही चालूच ठेवणार आहोत. नजीकच्या काळात राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत आम्हाला ६ ते ७ टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे पर्यटकांना चांगल्या सोयी मिळाव्यात या हेतूने व पर्यटन प्रसार करण्यासाठी आम्ही हॉटेल उद्योग, मनोरंजन, आरोग्य सेवा या क्षेत्रांमध्ये २ हजार कोटींचे करार करण्याचा निश्चय केला आहे, असे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे सह-व्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी यांनी सांगितले.

बुलेट ट्रेन बीकेसीतूनच धावणार
खऱ्या अर्थाने मेक इन इंडिया प्रकल्प ठरणाऱ्या मुंबई-दिल्ली अतिजलद रेल्वेसाठीच्या मुंबईतील स्थानक उभारणीचा प्रश्न सुटला असून ते वांद्रे-कुर्ला संकुलात भूमिगत स्वरूपात असेल, असा निर्वाळा रेल्वे मंडळाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांनी रविवारी येथे व्यक्त केला. अतिजलद रेल्वेकरिता बीकेसीतील जागेचीच निवड अंतिम करण्यात आली असून परिसरातील स्थानक भूमिगत असेल. स्थानकाकरिता दादर, कुर्ला तसेच ठाण्याचाही पर्याय होता. मात्र हेच ठिकाण उत्तम असून त्यासाठीची जागेची अडचण महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने दूर करण्यात आली आहे.मुंबई-दिल्ली अतिजलद रेल्वे ही ताशी २०० किलोमीटर वेगाने धावणार असून ५०८ किलोमीटरच्या या अंतरासाठी साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची किंमत एकूण ९,८०० कोटी रुपये आहे. जपानच्या जायकाबरोबर हा प्रकल्प येत्या दीड वर्षांत सुरू होऊन पुढील पाच वर्षांत तो पूर्ण केला जाईल, असेही मित्तल म्हणाले. खऱ्या अर्थाने मेक इन इंडिया असलेल्या या प्रकल्पाबरोबरच भारतात रेल्वे इंजिन तयार करणारे दोन प्रकल्प हे ४०,००० कोटी रुपयांचे असतील, अशी माहितीही या वेळी देण्यात आली.