कळवा येथील भूसार आळीतील ‘अन्नपूर्णा’ इमारत कोसळल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी दिवा-दातिवली भागातील गणेशनगरमधील ‘विष्णुकला’ ही पाच मजली अनधिकृत इमारत एका बाजूला झुकल्याचा प्रकार समोर आला. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इमारतीत राहणाऱ्या सुमारे ६६ कुटुंबांना इमारतीबाहेर काढले, पण सुरुवातीला रहिवाशांनी इमारतीबाहेर पडण्यास विरोध दर्शविल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान, या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट सुरू करण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
दातिवली भागातील गणेशनगरमध्ये २००८ साली ‘विष्णुकला’ ही पाच मजली अनधिकृत इमारत उभारण्यात आली असून या इमारतीच्या तीन ‘विंग’मध्ये सुमारे ६६ कुटुंबे वास्तव्य करतात. तसेच या इमारतीमध्ये सुमारे ११ गाळे आहेत. गुरुवारी सकाळी ही इमारत एका बाजूला झुकल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन इमारतीची पाहाणी केली आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रहिवाशांना इमारतीबाहेर काढण्यास सुरुवात केली. मात्र, बेघर होण्याच्या भीतीपोटी रहिवाशांनी सुरुवातीला इमारतीमधून बाहेर पडण्यास विरोध केला. त्या वेळी महापालिकेच्या पथकाने त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर रहिवाशी इमारतीबाहेर पडले. वर्तकनगर येथील भाडेतत्त्वावरील घरांमध्ये स्थलांतर होण्याचा पर्याय पालिकेने या इमारतीमधील रहिवाशांना दिला होता, पण इमारतीच्या विकासकाने सर्वच कुटुंबांची जबाबदारी घेऊन त्यांचे दिवा परिसरातच स्थलांतर केले, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.