मानवी शरीरातील संवेदनशील भाग किंवा खासगी भाग या शब्दप्रयोगाचा अर्थ हा समाज आणि संस्कृतीनुसार वेगवेगळा असल्यामुळे या शब्द प्रयोगाचा विचार आपल्या समाजात ग्राह्य़ धरण्यात येणाऱ्या अर्थानुसार करायला हवा. भारतीय संस्कृतीनुसार महिलेच्या कमरेखाली स्पर्श करणे हा तिच्या शालीनतेला धक्का आहे, असे मुंबईतील विशेष पोक्सो न्यायालयाने नमूद केले. तसेच एका दहा वर्षांच्या मुलीच्या पार्श्वभागाला लैंगिक अत्याचाराच्या हेतूने स्पर्श केल्याप्रकरणी २२ वर्षांच्या तरुणाला पाच वर्षांची शिक्षा सुनावली.

चार वर्षांपूर्वी, २०१७ मध्ये आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या आरोपानुसार, १० वर्षांची मुलगी मंदिरात जाण्यासाठी मैत्रिणीसोबत घराबाहेर पडली असता घराजवळ असलेल्या दुकानाजवळ बसलेल्या मुलांपैकी एका मुलाने तिच्या पार्श्वभागाला स्पर्श केला. या प्रकाराने घाबरलेली मुलगी घरी गेली आणि तिने घडला प्रकार पालकांना सांगितला. मुलीच्या वडिलांनी त्यानंतर पोलिसांत जाऊन आरोपीविरोधात तक्रार केली. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याला अटक केली. खटल्यादरम्यान न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला होता.

मुलीने तक्रार केल्यानंतर तिच्या आईने तरुण तिची छेड काढत असल्याचे सांगितले होते. छेड काढणे आणि स्पर्श करणे यात फरक आहे. तसेच पार्श्वभाग हा गुप्त भाग म्हणता येणार नाही, असा बचाव आरोपीच्या वतीने करण्यात आला.

न्यायालयाचे म्हणणे काय?

संवेदनशील भाग किंवा खासगी भाग हा शब्दप्रयोग आपल्या समाजातील अर्थानुसार ग्राह्य़ धरायला हवा. आरोपीच्या वकिलाने गूगलवरील व्याखेच्या संदर्भ देत पार्श्वभाग हा काही संवेदनशील असू शकत नाही. परंतु आपल्याकडील सामाजातील संदर्भानुसार विचार केला तर आपल्याकडे हा अर्थ स्वीकारला जाणार नाही, असे नमूद केले. आरोपीने लैंगिक अत्याचाराच्या हेतूने मुलीच्या पार्श्वभागाला स्पर्श केला नाही असे म्हणता येणार नाही. आरोपीने आपल्या गुप्त भागाला स्पर्श केल्याचे मुलीने आई-वडिलांना आणि पोलिसांना सांगितले होते. घटना घडली तेव्हा मुलगी अवघी १० वर्षांची होती. त्यामुळे तिला जे कळले ते तिने आई-वडिलांना सांगितले. त्यावरून आरोपीने तिची केवळ छेडछाड काढली नाही, तर तिला अयोग्यरीत्या स्पर्श केला, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले.