महापालिकेचा निर्णय; अनधिकृत पार्किंग, झोपडय़ांवर नियंत्रण

मुंबईतील उड्डाणपुलांखालील जागेत वाहनतळ सुरू करण्यास न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर महापालिकेने या उड्डाणपुलांखाली उद्याने विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी माटुंगा येथील पुलाखाली उभारण्यात आलेल्या उद्यानाला पसंतीची पावती मिळू लागल्यानंतर आता शहरातील २९ उड्डाणपुलांखाली उद्याने उभी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे या उड्डाणपुलांखाली असलेले बेकायदा वाहनतळ बंद होणार असून या ठिकाणी चालणारे बेकायदा उद्योग तसेच झोपडय़ांनाही आवर लागणार आहे.

मुंबई शहरात मोकळ्या जागांचे प्रमाण अतिशय कमी आहे. जागतिक निकषांनुसार व्यक्तीमागे चार चौरस मीटर मोकळी जागा आवश्यक असताना मुंबईत मात्र हे प्रमाण अवघे १.२८ चौरस मीटरएवढेच आहे. तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या मुंबईचा भूभाग वाढवण्यास मर्यादा असताना त्याचप्रमाणे लोकसंख्या व व्यवसायांसाठी सातत्याने नवीन बांधकाम उभे राहत असल्याने वेगवेगळ्या कल्पना लढवून उद्यान व बागांचे क्षेत्रफळ वाढवले जाते. उड्डाणपुलांखाली बागा करण्याची कल्पना त्यातूनच पुढे आली. त्यातच उड्डाणपुलांखालील वाहनतळांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हलवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याची पाश्र्वभूमी या कल्पनेमागे होती. त्यानुसार तीन वर्षांपूर्वी माटुंगा येथील नानालाल मेहता उड्डाणपुलांखाली ७२०० चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये उद्यान तयार करण्यासाठी कंत्राट दिले गेले. जून २०१६ मध्ये या उद्यानाचे उद्घाटन झाले. पालिकेच्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने शहरातील इतर उड्डाणपुलांच्या खाली बागा तयार करण्याच्या योजनेला प्रोत्साहन मिळाले. मात्र शहरातील काही पूल पालिकेतर संस्थांकडे असल्याने आणि या संस्थांनी उद्यान तयार करण्यास मान्यता न दिल्याने दोन वर्षे ही योजना बारगळली. मात्र आता २९ उड्डाणपुलांखाली उद्याने तयार करण्याची योजना अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याबाबत निविदा काढण्यात येतील. वांद्रे येथील कलानगर उड्डाणपुलाखाली ८ हजार चौरस मीटर तर विक्रोळी येथील कन्नमवार उड्डाणपुलाखाली ७९०० चौरस मीटर जागा आहे. हे दोन्ही उड्डाणपूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) आहेत. उद्यानांना जागा दिल्यास पुलांची डागडुजी करणे कठीण होईल असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते.

या पुलांखाली उद्याने

दक्षिण भागात जेजे उड्डाणपूल, वाय पूल, दादर स्थानकाजवळील केशवसुत उड्डाणपूल, हिंदमाता, एल्फिन्स्टन उड्डाणपूल आणि वरळीला नेहरू केंद्रासमोरील पूल.

पश्चिम उपनगरांत कलानगर, खेरवाडी, अंधेरी पश्चिमेचा गोखले पूल, जोगेश्वरीचा बाळासाहेब ठाकरे पूल, मृणाल गोरे पूल, वीर  सावरकर पूल, दहिसर स्थानकाबाहेरील दोन्ही स्कायवॉक आणि आनंदनगर पूल.

पूर्व उपनगरात कुर्ला, बुद्ध कॉलनी, मानखुर्द टी जंक्शन, गोवंडी, वाशीनाका, अमर महाल जंक्शन, अंधेरी घाटकोपर लिंक रोडखाली चार ठिकाणी, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडखाली दोन ठिकाणी, विक्रोळी येथील पूर्व द्रुतगती महामार्गाच्या  उड्डाणपुलाखाली.