पुन्हा बदली किंवा प्रतिनियुक्तीच्या हालचाली

कायद्याच्या चौकटीत राहूनच बेधडक काम करणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिका आयुक्तपदावरुन मंत्रालयात बदली होऊन एक महिना होत आला तरी अजून ते मंत्रालयात रुजू झालेले नाहीत. त्यांची पुन्हा अन्यत्र बदली करण्याच्या किंवा त्यांना केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठविण्याच्या हालचाली सुरु असल्याचे समजते.

जिल्हाधिकारी असो, महापालिका आयुक्त असो, की परिवहन विभागाचे प्रमुख असो, कठोरपणाने प्रशासनात शिस्त आणणे आणि कोणतीही बेकायदा गोष्ट कायद्याची कडक अंमलबजावणी करुन मोडून काढणे या त्यांच्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे ते राजकारण्यांचे नावडते अधिकारी असल्याचे मानले जाते. त्यामुळे ज्या धडाक्याने ते काम करतात, त्याच धडाक्याने त्यांच्या बदल्या होतात. पुणे परिवहन आयुक्तपादावरुन त्यांची नऊ-दहा महिन्यांतच नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. त्यांच्या कडक शिस्तिीच्या कार्यशैलीमुळे सत्ताधारी पक्षाशी त्यांचे खटके उडत गेले. अखेर नाशिक पालिकेतूनही त्यांची तडकाफडकी मंत्रालयात बदली करण्यात आली.

सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या सहीने २२ नोव्हेंबरला  मुंढे यांची मंत्रालयात नियोजन विभागात सहसचिवपदावर नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला. मुंबईतून मुंंबईत बदली असेल तर एक दिवसात बदलीच्या जागी हजर होणे आवश्यक आहे. मुंबईच्या बाहेरून बदली असेल तर रुजू होण्यासाठी सात दिवसांची मुदत असते. परंतु मुंढे अजून त्यांच्या बदलीच्या जागी रुजू झाले नाहीत, असे कुंटे यांनी सागितले.

मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कडक शिस्तीचे तुकाराम मुंढे नियोजन विभागातील वरिष्ठांना नको आहेत. त्यांना रुजू करुन घेण्यासच नकार दिला जात आहे. त्यामुळे त्यांची पुन्हा अन्यत्र बदली किंवा केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठविण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र त्याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, असे सांगण्यात येते.