डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येपूर्वी गेल्या पाच वर्षांत नायर रुग्णालयात रॅगिंगच्या चार तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र या तक्रारींपैकी एकाच तक्रारीमध्ये कारवाई केल्याचे माहितीच्या अधिकारात निदर्शनास आले आहे.

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षांच्या विद्यार्थ्यांने वसतिगृहात दुसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्याची तक्रार केली होती. यामध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षांच्या चार विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने एक महिन्यासाठी निलंबित केले. तसेच यातील दोन विद्यार्थ्यांना वसतिगृहातून सहा महिन्यासाठी निलंबित केले आणि दुसऱ्या दोन विद्यार्थ्यांना वसतिगृहातून कायमस्वरूपी काढून टाकले. त्यानंतर याच वर्षांत मायक्रोबायोलॉजीच्या पहिल्या वर्षांच्या निवासी डॉक्टरांनी रॅिगगची तक्रार केली होती. २०१५ मध्ये रॅगिंगची एक तक्रार दाखल झाली असून फिजिओलॉजी विभागातील एका निवासी डॉक्टरांनी केली होती.

२०१६ आणि २०१७ मध्ये एकही तक्रार आलेली नाही. या वर्षांत समितीने वर्षांतून दोन वेळाच बैठक घेऊन रॅगिंग प्रतिबंधात्मक उपायांची चर्चा केली असल्याचे रुग्णालयाने नमूद केले आहे.

आरोपींची चौकशी भायखळा तुरुंगात

डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीबाबत गुन्हे शाखेने सोमवारी अटकेत असलेल्या तीन डॉक्टर महिलांकडे भायखळा कारागृहात चौकशी केली. मात्र पहिल्या दिवशी आरोपींकडून अपेक्षित माहिती न मिळाल्याने आणखी काही दिवस चौकशी सुरू राहील, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

डॉ. पायल यांच्या मोबाइलमध्ये चिठ्ठीचे छायाचित्र सापडले. मात्र नायर रुग्णालयातील वसतिगृहातील डॉ. पायल यांच्या खोलीत चिठ्ठीची मूळ प्रत पोलिसांना सापडली नव्हती. त्यामुळे आरोपींनी ती दडवून ठेवली किंवा नष्ट केल्याचा संशय बळावला. चिठ्ठीचे गूढ उकलून भक्कम पुरावा गोळा करण्यासाठी गुन्हे शाखेने कारागृहात बंद असलेल्या आरोपींकडे चौकशी करण्याची परवानगी विशेष सत्र न्यायालयाकडे मागितली. ती न्यायालयाने मान्य केली.