उल्हास नगर येथील कॅम्प ५ येथील भाटिया चौकात मुरलीवाला कॉम्प्लेक्स या चार मजली इमारतीच्या स्लॅब रविवारी सायंकाळी कोसळला. या स्लॅबखाली दबून एका ४७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. लीना गंगवानी असे मृत महिलेचे नाव आहे.

उल्हासनगर कॅम्प ५ येथील भाटिया चौकात मुरलीवाला कॉम्प्लेक्स ही चार मजली इमारत आहे. या इमारतीत एकूण १६ सदनिका आणि ४ व्यावसायिक गाळे आहेत. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील ३०३ या सदनिकेचे मालक विकास बालाणी यांच्याकडे लादी लावण्याचे काम चालू होते. त्या सदनिकेचा स्लॅब रविवारी सायंकाळी दुसऱ्या मजल्यावरील २०३ या सदनिकेवर कोसळला. या स्लॅब खाली लीना गंगवानी, त्यांचा मुलगा रोहित गंगवानी आणि शरद गंगवानी हे दबले गेले. यात लीना गंगवानी यांचा मृत्यू झाला.

ही बातमी समजताच पालिकेची अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन यंत्रणा विभाग, पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, श्याम सिंग, महेंद्र परब आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून इमारत तात्काळ रिकामी केली. स्थानिक नगरसेवक भरत गंगोत्री यांनी ही इमारत धोकादायक इमारतीच्या यादीत नसल्याचे सांगितले.