मंकी हिल ते ठाकुरवाडीपर्यंत चार किलोमीटर बोगद्याची चाचपणी, मध्य रेल्वेकडून सर्वेक्षण सुरू

मुंबई : पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटनांमुळे मुंबई ते पुणे रेल्वे सेवा अनेकदा या वर्षी विस्कळीत झाली. या मार्गावरील पावसाळ्यातील प्रवास सुकर करण्यासाठी दरड कोसळणाऱ्या मंकी हिल ते ठाकुरवाडी भागात चार किलोमीटरचा बोगदा उभारण्यासाठी मध्य रेल्वेने सर्वेक्षण सुरू केले आहे. त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी लवकरच रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा कर्जत ते लोणावळादरम्यानच्या भागाला मोठय़ा प्रमाणात फटका बसला. मंकी हिल ते ठाकुरवाडीपर्यंतच्या मार्गावर डोंगरावरून दरड आणि चिखल रुळावर आल्याने रुळांना धोका पोहोचण्याबरोबरच सिग्नल यंत्रणेचीही समस्या निर्माण झाली. परिणामी, मुंबई ते पुणे मार्गावरील रेल्वे सेवा अनेक दिवस बंद झाली.

पावसाळ्यात या मार्गावरील सेवा सुरळीत ठेवण्यासाठी दरड कोसळणाऱ्या मंकी हिल ते ठाकुरवाडीपर्यंत चार किलोमीटरचा बोगदा उभारण्याचा विचार असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले होते. मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी कोकण रेल्वे, रिसर्च डिझाइन स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन, रेल्वे महाव्यवस्थापक आणि अभियंते सुबोध कुमार जैन आणि अन्य तज्ज्ञांसह दरड कोसळणाऱ्या भागाची पाहणी केली. यानंतर मध्य रेल्वेने तेथे बोगदा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या कर्जत ते लोणावळादरम्यान तीन मार्गिका असून यातील मधली मार्गिका आणि अप मार्गिकेच्या दरम्यान आणखी एक मार्गिका उभारली जात आहे. त्याच भागात असलेल्या मंकी हिल ते ठाकुरवाडीपर्यंत चार किलोमीटरचा बोगदा उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचे सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या कर्जत ते लोणावळा घाट क्षेत्रात अप-डाऊन छोटे-मोठे ५२ बोगदे आहेत. त्यामुळे आणखी एका चार किलोमीटरच्या बोगद्याची भर पडण्याची शक्यता आहे.

बोगदा उभारण्यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. बोगदा उभारण्यासाठी लागणारी जागा, सुरक्षितता, रेल्वे रुळांचे काम, त्यासाठी येणारा खर्च आदींचा सर्वेक्षणात समावेश आहे. त्याचा प्रस्ताव बनवून रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याचे मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.