तृतीयपंथी, बांधकाम कामगार, फेरीवाले यांना लाभ

मुंबई : करोना प्रतिबंधात्मक लस घ्यायची इच्छा असून कागदपत्रांअभावी किंवा अज्ञानामुळे लस घ्यायला पुढे येत नसलेल्यांसाठी पालिकेतर्फे फिरती लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. फेरीवाले, देहविक्रय करणाऱ्या महिला, एचआयव्हीग्रस्त, तृतीयपंथी अशा दुर्लक्षित समाज घटकांचे लसीकरण करण्यासाठी पालिका आणि ‘व्हॅक्सिन ऑन व्हिल्स अमेरिकन इंडिया फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने चार फिरती लसीकरण केंद्रे सुरूकरण्यात आली आहेत.

लसीकरण केंद्रापर्यंत येऊ न शकणाऱ्या दुर्लक्षित घटकांपर्यंत लसीकरण केंद्रच नेण्याचा उपक्रम पालिकेने हाती घेतला आहे. या फिरत्या लसीकरण के ंद्राचे (मोबाइल व्हॅक्सिनेशन युनिट) सोमवारी अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य)  संजय कुऱ्हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, ‘व्हॅक्सीन ऑन व्हिल्स्’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जिग्नेश पटेल, उपक्रम व्यवस्थापक संगीता मोरे आदी उपस्थित होते.

या केंद्रांवर एचआयव्ही रुग्ण, देह विक्रय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिला, तृतीयपंथी, बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते अशा विविध समाजघटकांना लसीकरणासाठी त्यांना आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण करून विनामूल्य लस देण्यात येणार आहे. सोमवारी पहिल्या दिवशी महात्मा फुले मंडई परिसरातील पदपथावरील ५० विक्रेते आणि देह विक्रय करणाऱ्या २५ महिलांचे लसीकरण करण्यात आले.

संबंधित समाज घटकांच्या परिसरात पालिकेने नेमून दिलेल्या जागी फिरते लसीकरण केंद्र पोहोचेल. १२ ऑगस्ट २०२१ पासून या केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये पदपथावरील विक्रेत्यांसाठी बोरिवली भागात पहिले लसीकरण केंद्र तर मालवणी, मालाड, भांडुपमध्ये दुसरे केंद्र कार्यान्वित राहील. देहविक्रय करणाऱ्या महिलांचे लसीकरण करण्यासाठी भांडुप-मुलुंडमध्ये तिसरे केंद्र, तर ग्रँटरोड आणि कामाठीपुरा भागात चौथे केंद्र कार्यान्वित राहील.