मुंबईत पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे १५० औषधविक्रेते सहभागी

क्षयरोग रुग्णांना आता राज्यभरातील खासगी औषधविक्रीच्या दुकानांमध्ये क्षयरोगाची औषधे मोफत मिळणार असून मुंबईमध्ये सध्या सुमारे १५० औषध विक्रेत्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यभरात दरवर्षी क्षयरोगामुळे मृत पावणाऱ्या रुग्णांपैकी १८ टक्के रुग्ण हे मुंबईमध्ये आहेत, मागील तीन वर्षांमध्ये ३.७७ लाख क्षयरोगाचे रुग्ण राज्यभरात आढळले असून यापैकी ७१,३६८ रुग्ण हे मुंबईमध्ये आढळून आले आहेत.

देशभरात झपाटय़ाने फोफावत चालेल्या क्षयरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने २०२५ पर्यत ‘क्षयरोगमुक्त भारत’ निर्माण करण्याची मोहीम हाती घेतली असून यासाठी राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून राज्यभरामध्ये औषध विक्रीच्या दुकानांमध्ये क्षयरोगाची औषधे मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी सरकारने अन्न व औषध प्रशासनाला १४ फेब्रुवारी रोजी पत्राद्वारे कळविले होते. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनानेही या योजनेला मंजुरी दिली असून राज्यभरातील परवानाधारक औषध विक्रीच्या दुकानांमध्ये क्षयरोगाची औषधे मोफत देण्यास परवानगी दिली आहे.

क्षयरोगाचे जे रुग्ण सरकारी आरोग्य केंद्रावर न येता खासगी डॉक्टरांकडे उपचार घेत असतील, अशा रुग्णांनाही मोफत औषधे मिळावीत यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

औषध विक्रेत्यांच्या माध्यमातून या रुग्णांची नोंदणी केली जाऊन उपचार पूर्णपणे घेत आहेत का, याची पडताळणीही करणे सोपे जाईल, या उद्देशातून ही योजना सुरू केलेली आहे.

या योजनेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या औषध विक्रेत्यांनी पालिकेशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याशी करार केला जाईल. दुकानामध्ये येणाऱ्या क्षयरोग रुग्णांची माहिती आणि संबंधित डॉक्टर याची माहिती विक्रेत्याने देणे बंधनकारक असेल. तसेच रुग्णाने औषधे घेतल्यानंतर त्याची सहीदेखील घेतली जाईल. पालिकेच्या आरोग्य केंद्रामार्फत या दुकानांना औषध पुरवठा केला जाऊन त्यांची नोंदणी केली जाईल. या योजनेची नुकतीच सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे १५० औषधविक्रेत्यांनी यामध्ये नोंदणी केली असल्याचे पालिकेच्या क्षयरोग नियंत्रण विभागाच्या प्रमुख डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले. अधिकाधिक औषध विक्रेत्या केंद्रांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

रुग्णास ५०० रुपये प्रतिमहिना

क्षयरोग रुग्णाची माहिती देणारे औषधविक्रेता, डॉक्टर किंवा अन्य कुणीही व्यक्ती यांना हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. तसेच क्षयरोग रुग्णांनाही उपचार सुरू असेपर्यंत ५०० रुपये प्रतिमहिना देण्यात येणार असल्याचे केंद्रीय क्षयरोग विभागाचे उपमहासंचालक डॉ. सुनील खापर्डे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या संदर्भात राज्य सरकारला पत्राद्वारे कळविण्यात आले असून लवकरच याची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

  • क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमासाठी यावर्षी राज्य सरकारने ७६२१ कोटी आणि पालिकेने २१३८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.