देवनार कचराभूमीत वारंवार आग लागण्याच्या घटनांमागे शिवसेनेला बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीदेखील आगीच्या या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. एक केंद्रीय पथक आता याठिकाणी पाहणीसाठी पाठविण्यात येणार आहे. या पथकाच्या अहवालात ही आग निष्काळजीपणामुळे लागल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात येतील, असे जावडेकर यांनी सांगितले.
देवनार कचराभूमीजवळ पुन्हा धुराचे लोट, अग्निशमन कार्यास गती 
देवनार कचराभूमीला शनिवारी दुपारी लागलेल्या आगीने रविवारी सकाळी अकराच्या सुमारास अक्राळविक्राळ रूप धारण केले. अग्निशमन दलाचे आठ बंब आणि पाण्याच्या आठ टँकरच्या मदतीने रविवारी रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, सोमवारी सकाळीदेखील ही आग धुमसतच असल्याचे स्पष्ट झाले. कचऱ्याला आग लागल्याने निर्माण झालेल्या धुराने देवनारच्या आसपास राहणाऱ्या अनेक नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. सध्या या ठिकाणी अग्निशामक दलाचे ११ बंब आणि पाण्याचे ८ टॅंकर आग विझवण्याचे काम करीत आहेत.