News Flash

गॅलऱ्यांचा फेरा : ८६८८ मैलांचं अंतर..

या प्रदर्शनातली आणखी एक महत्त्वाची कलाकृती म्हणजे क्लॉस वेबर यांची ‘सॅण्डफाऊंटन’.

मुंबई ते लॉस एंजलिस या शहरांमधल्या अंतराचा (नॉटिकल किंवा सागरी मैलांतला) आकडा आहे हा : ८६८८. तो आकडा, हेच एका प्रदर्शनाचं नाव आहे. आणि ते प्रदर्शन जिथं भरलंय, त्या कलादालनाचं नाव ‘प्रोजेक्ट ८८’. कुलाब्याला अग्निशमन दलापासच्या बसस्टॉपवरून ‘मुकेश मिलची गल्ली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायण आत्माराम सावंत मार्गावर, महापालिका शाळेसमोरच्या ‘बीएमपी बिल्डिंग’मध्ये हे गोदामवजा मोठ्ठं कलादालन आहे. यंदाच्या प्रदर्शनात १२ चित्रकार/ शिल्पकार/ मांडणशिल्पकारांचा सहभाग आहे आणि त्याच्या वैचारिक नियोजनाची (क्युरेटिंग) जबाबदारी डायना कॅम्प्बेल बिटान्कोर्त यांनी पार पाडली आहे. अनेकदा अशा विचारनियोजित प्रदर्शनांतून ‘क्युरेटर’ काही तरी वेगळं सांगताहेत आणि कलावंत मंडळी त्यांना हवं ते करताहेत, असा अनुभव प्रेक्षकाला येत असतो; कारण दृश्यकलेतल्या कलाकृती वैचारिक नियोजनातून मांडण्यासाठी आधी दृश्यातही विचार होऊ शकतो हे मान्य करायला हवं, याची कल्पनाच नसल्यासारखं काम अनेक क्युरेटर करत असतात! हे प्रदर्शन मात्र त्याला अपवाद ठरावं. इथं पृथ्वीच्या बरोब्बर एकमेकांपासून विरुद्ध आणि उलटय़ा टोकांवरली दोन शहरं- गोलाच्या या आणि त्या बाजूंना असूनही प्रत्येक शहरानं टिकवलेलं गुरुत्वाकर्षण, तरीही फक्त त्याच शहरापुरते मर्यादित न राहिलेले -म्हणजे एक प्रकारे गुरुत्वाकर्षण झुगारणारे- कलावंत आणि इथं, आत्ता त्यांनी घडवलेल्या ‘गुरुत्वाकर्षण स्वीकारणाऱ्या किंवा नाकारणाऱ्या’ किंवा व्यापक अर्थानं ‘दोन्ही टोकं पाहणाऱ्या’ कलाकृती, असा विचार या प्रदर्शनामागे आहे. म्हणजे काय आहे?

त्यासाठी श्रेयस कर्ले (बोरिवली, मुंबई) यांची एक साधीशी ‘कलाकृती’- किंवा तिचा भाग- पाहायला हवा. दोन काचेचे लांबुळके प्याले (‘ग्लास’) एकमेकांकडे तोंड करून उलटसुलट ठेवलेले आहेत आणि त्या दोन्ही ग्लासांत मिळून ठेवलेलं पाणी, वरच्या ग्लासातही ७५ टक्के भरलेलं आहे. हा घरीही करून पाहता येण्याजोगा प्रयोग, इथं ‘कलाकृतीचा भाग’ म्हणून ठेवताना त्यासोबत काही ‘घरच्या घरी सुचणाऱ्या’ मिथ्यकथाही श्रेयस कर्ले यांनी ड्रॉइंगच्या स्वरूपात मांडल्या आहेत. मेरूपर्वत नेमका कुठे होता, वगैरेंबद्दल जे प्रत्येकाचे अंदाज असतात त्यांच्याशी ही ड्रॉइंग्ज संबंधित आहेत. ती पाहिल्यानंतर पुन्हा त्या ग्लासजोडीकडे पाहिलंत तर वाटेल, वरचा ग्लास काढून घेतल्यास या डोलाऱ्याला अर्थच नाही!

हे असं काही तरी तुम्हाला वाटण्यामागे तुमच्या राजकीय, नैतिक भूमिका कार्यरत असतात का? बहुतेकदा असतातच! इथल्या अनेक कलाकृतीही या अशा राजकीय, नैतिक भूमिका घेऊनच झाल्या आहेत. ‘शुद्ध कले’चा आनंद मिळाल्यासारखं ज्या कलाकृतींमुळे वाटेल, त्यांचा तांत्रिक किंवा कौशल्याचा दर्जा फार चांगला नाही, असं प्रथमदर्शनी भासेल. उदाहरणार्थ डेव्हिड होर्विट्झ यांनी घडवलेल्या फुलदाणीवजा बाटल्या! इतक्या छान आकाराच्या बाटल्या एवढय़ा कशा काय ओबडधोबड आणि फुटल्यासारख्या? तर त्या मुळात फुटलेल्याच बाटल्या होत्या.. आपल्या गिरगाव चौपाटीसह जगभरच्या सहा समुद्रकिनाऱ्यांवर सापडलेल्या फुटक्या हिरव्या बाटल्या डेव्हिड यांनी जमवल्या. त्या अर्धवट वितळवून पुन्हा नव्यानं घाटदार, फुलदाणीसारख्या आकारात डेव्हिड यांनी घडवल्या. हे करताना मूळच्या फुटक्या तुकडय़ांचा ओबडधोबडपणा कायम राहिला- नव्हे, ठेवला गेला. किंवा थेरेसा बुर्गा यांनी १९७२ सालचं एक बालचित्रवजा दिसणारं चित्र हुडकून, त्याबरहकूम- पण अगदी निराळ्या रंगसाधनांनिशी- तसंच चित्र काढण्याचा प्रयत्न २०१३ सालात केला, त्या मालिकेतली दोन-दोन चित्रं इथं आहेत. वरवर पाहाता ती अनाकर्षक, फार तर बालकलेसारखीच वाटतील. पण प्रत्यक्षात ‘करून पाहणं आणि पाहून करणं’ यांतला फरक मूर्तिमंत साकार करणारी अशी ही कलाकृती आहे. काळाच्या दोन बिंदूंना जोडणारी ही कलाकृती आहे.

या प्रदर्शनातली आणखी एक महत्त्वाची कलाकृती म्हणजे क्लॉस वेबर यांची ‘सॅण्डफाऊंटन’. वाळूच्या घडय़ातल्यासारखी वाळू इथं एका कारंज्यात आहे. पाण्याऐवजी ही वाळूच खालीच सरकणार आहे. काळाच्या ऱ्हासाचं हे शिल्प अर्थातच केवळ गुरुत्वाकर्षणामुळे सिद्ध झालं आहे.

या बारा कलाकृती पाहताना, विचार आणि दृश्यं यांमध्ये किती अंतर असतं, याचा विचार आपण नकळतपणे करू लागतो. तो पुढे नेल्यास आपलं भलंच होणार असतं.

जाळ्या आणि सावल्या..

बशुधरा मुखर्जी या बडोद्याच्या ‘महाराजा सयाजीराव विद्यापीठा’त शिकल्या, तेव्हापासून अगदी निराळ्याच प्रकारातल्या कलाकृती त्या घडवत आहेत.. कागद किंवा कॅनव्हासच्या पट्टय़ा कापून घेऊन त्या एकमेकांशी पुन्हा (जाळं विणल्यासारख्या) जोडून मुखर्जी यांची कलाकृती घडते. तिला ‘अर्थ’ असतोच असं नाही.. अशा कलाकृती अलंकारिक भासतात, पण अमूर्ततेचाही आनंद देतात. हे शब्द वाचायला अवघड वाटत असतील, तर शेजारच्या छायाचित्रात पाहा. पट्टय़ा एकमेकींना जाळं विणल्यासारख्या जोडण्यातून एक डिझाइन साकार होत राहातं. त्यावर प्रकाश पडला की मागल्या बाजूनं सावल्या पडतात. प्रकाशाचे स्रोत (दिवे) जितके जास्त, तितक्या सावल्याही जास्त.

या खेळाला अर्थ देण्याचा प्रयत्न म्हणून, जुने महाल, दरवाजे, महालांचे अंतर्भाग यांचा- विरविरीत होत जाणाऱ्या गतकाळाचा भास होईल अशा प्रतिमा आधी कॅनव्हासवर रंगवून घेऊन मग त्यांवर कातरकाम करण्याचाही मार्ग मुखर्जी यांनी काही कलाकृतींत निवडला आहे. म्हणजे, कॅनव्हासवर कातरकाम किंवा कॅनव्हासच्याच पट्टय़ा कापून जोडणं या दोनपैकी एका प्रकारातून इथल्या कलाकृती बनल्या आहेत.

..आणि जहांगीर’!

जहांगीर आर्ट गॅलरीत डी. एस. राणे यांचं चित्रप्रदर्शन सात वर्षांच्या खंडानंतर लागतं आहे. साधी सहज वाटणारी प्रासादिक शैली, काहीशी केजी सुब्रमणियन यांची आठवण करून देणारी प्रतिमासृष्टी आणि तरीही केजींच्या वा अन्य कुणाच्या ‘वर्णनात्मक शैली’शी नातं न सांगणारी चित्रं, हे राणे यांचं वैशिष्टय़. कालातीत विषय रंगवताना राणे काळाच्या एखाद्यात कुठल्या तरी बिंदूची निवड करतात. त्या क्षणी काय घडलं होतं एवढंच दाखवतात, परंतु कालातीत परिणाम साधतात. झरझर केल्यासारखं रंगलेपन, एकदाच ओढलेली गोलाईदार बाह्य़रेषा ही दृश्यवैशिष्टय़ं ‘भारतीय आधुनिक’ परंपरेशी नातं सांगणारी आहेत.

याखेरीज, देविदास धर्माधिकारी यांच्या अश्वचित्रांचं प्रदर्शन ‘जहांगीर’च्या दुसऱ्या भागात, तर सुचिता तरडे यांच्या अमूर्तचित्रांचं प्रदर्शन जहांगीर कलादालनाच्याच (मधल्या बंदिस्त जिन्याने) पहिल्या मजल्यावरल्या ‘हिरजी जहांगीर कलादालना’मध्ये २७ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. ‘जहांगीर’ संकुलातली अन्य प्रदर्शनं २८ रोजीपर्यंत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 2:59 am

Web Title: gaalry in bmc building mukesh mill
Next Stories
1 सहज सफर : सूर्यपुत्राची वाघोली
2 चलनकल्लोळाचा शेतकऱ्यांना फटका
3 आयुक्तांनी शिवसेनेला ‘पाणी’ दाखवले!
Just Now!
X