पालिकेकडून आतापर्यंत केवळ ९३५ मंडळांना मान्यता

गणरायाचे आगमन काही तासांवर आले असतानाही, मुंबईतील अवघ्या ९३५ गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांना पालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. गणेशोत्सव मंडपांसाठी पालिकेकडे आलेल्या दोन हजारहून अधिक अर्जापैकी बहुतांश अर्ज पोलिसांच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्रामुळे पालिकेकडे प्रलंबित आहेत. तर मुंबईत यंदा एकूण चार हजारांहून अधिक मंडप उभारण्यात आल्याचा अंदाज आहे. त्यानुसार, गणेशचतुर्थीच्या दिवसापर्यंत मुंबईत तीन हजारहून अधिक मंडप विनापरवानगी उभारण्यात आले असून अशा मंडपांच्या तक्रारींसाठी पालिकेने हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत.

गणेशोत्सव मंडपांसाठी गुरुवारी संध्याकाळपर्यंत केवळ ९३५ मंडळांना परवानगी देण्यात आली. पालिकेकडे २०८५ मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले होते. त्यातील २३९ मंडळांचे अर्ज फेटाळण्यात आले तर उर्वरित मंडळांपैकी बहुतेकांना पोलिसांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले नसल्याने ९११ मंडपांचे अर्ज प्रलंबित असल्याची आकडेवारी पालिकेकडून देण्यात आली आहे. गेल्या वर्षी २४५४ मंडपांसाठी परवानगी मागण्यात आली होती. प्रत्यक्षात गणेशोत्सव सुरू होईपर्यंत केवळ ९८२ मंडपांना परवानगी मिळाली होती. १००९ मंडपांच्या परवानगी प्रलंबित होत्या तर ४६३ मंडपांना परवानगीच दिली गेली नाही. प्रत्यक्षात मुंबईत चार हजाराहून अधिक ठिकाणी मंडप उभारले गेल्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदाही बहुतांश मंडळांकडून विनापरवानगी गणेशोत्सव साजरा केला जाण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, गेली १२४ वर्षे साजरा करण्यात येणारा सार्वजनिक गणेशोत्सव यावेळी उत्साहात साजरा करण्यासाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईकरांना शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी गणेशोत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी पालिका व पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे तसेच ध्वनिप्रदूषणाची मर्यादा पाळण्याचे आवाहन महापौरांनी केला आहे. पालिकेने प्रकाशित केलेल्या गणेशोत्सव माहिती पुस्तिकेतही सार्वजनिक उत्सव मंडळांनीही ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. मुंबई महानगराचा मानबिंदू असलेला गणेशोत्सव सोहळा साजरा करताना उत्सवस्थळी आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत ध्वनिक्षेपकाचा आवाज संयमित ठेवण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

भरती-ओहोटीच्या वेळा

दीड दिवसांचे गणेशविसर्जन २६ ऑगस्ट रोजी होत असून दुपारी ३ वाजता भरती तर ९ वाजता ओहोटी असेल. २९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता भरती तर रात्री ११ वाजता ओहोटी आहे. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता ओहोटी व रात्री आठ वाजता भरती, ५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेअकरा वाजता व रात्री पावणेबाराच्या सुमारास भरती असून संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ओहोटी आहे. ६ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता ओहोटी असेल.

मंडप, ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारीसाठी..

ध्वनिप्रदूषण नियमन व नियंत्रणासाठी पोलीस ठाणेनिहाय पदनिर्देशित अधिकाऱ्यांची यादी पालिकेच्या  http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आली आहे. रस्ते, पदपथांवर उभे करण्यात आलेले अनधिकृत मंडप आणि ध्वनिप्रदूषणाबाबत पालिकेच्या १२९१ आणि १२९३ या क्रमांकावर तक्रार करता येईल.