मंडपाच्या जागेबाबत वेळीच निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा

मुंबई : गेले तीन महिने सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे मातीचा अभाव, उंचीबाबत अस्पष्टता, कारागिरांचा तुटवडा, दळणवळणाचे प्रश्न अशा अनेक समस्यांना मूर्तिकार तोंड देत आहेत. त्यातच गणेशोत्सव अवघ्या ४६ दिवसांवर आलेला असताना अद्याप मूर्तिकारांना कार्यशाळांसाठी पालिकेकडून जागा मिळालेली नाही. वेळीच निर्णय न घेतल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशारा मूर्तिकार संघाचे अध्यक्ष अण्णा तोंडवळकर यांनी दिला आहे.

जून महिना उजाडताच मुंबईच्या रस्त्यांलगत गणेशमूर्तीच्या कार्यशाळा उभारण्याचे काम सुरू होते, परंतु यंदा रस्त्यावरील मंडपांना परवानगी देणार नसल्याची भूमिका पालिकेने घेतली आहे. त्यामुळे आता कार्यशाळा उभारायच्या कोठे, असा पेच मूर्तिकारांपुढे आहे. आधीच उंचीबाबत असलेल्या अस्पष्टतेमुळे कामाला विलंब झाला होता. आता सरकारने चार फुटांची मर्यादा घातल्यावर मूर्तिकारांनी कंबर कसली, परंतु जागेसाठी पालिकेकडून परवानगी मिळत नसल्याने अद्याप मूर्तिकामाचा श्रीगणेशा झालेला नाही.

मुंबईतील ५ टक्के  मूर्तिकारांकडे खासगी जागा आहेत, तर ९५ टक्के  मूर्तिकार पालिकेच्या जागेवर अवलंबून असतात. कार्यशाळांना पालिका नकार देत आहे. मूर्तिकारांना पालिके ने किमान दिलासा तरी द्यावा, अशी मागणी मूर्तिकार रेश्मा खातू यांनी केली आहे. उत्पन्नाचे स्रोत खुंटले आहेत, कामगारवर्ग नाही, अशा परिस्थितीत कार्यशाळा उभारणीसाठी जुळवाजुळव करताना दमछाक होत आहे. त्यात आता जागेसाठीही झगडावे लागत असल्याने हा तिढा अधिकच वाढल्याची खंत मूर्तिकार उदय खातू यांनी व्यक्त के ली.

पालिकेकडून सोमवार, ६ जुलैपर्यंत सकारात्मक निर्णय येईल, असे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी दिले आहे. तसे न झाल्यास आंदोलनाची भूमिका कायम राहील, असेही तोंडवळकर यांनी स्पष्ट केले. याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

पालिकेने जागा द्यावी

मूर्तिकारांपुढे जागेचा प्रश्न दरवर्षीच असतो, परंतु यंदा मूर्तिकारांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. गणेशोत्सव तोंडावर आला तरी काम सुरू झालेले नाही. अशी स्थिती अजून काही दिवस राहिली तर मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे पालिकेने योग्य विचार करून आम्हाला जागा द्यावी. अनेक प्रशस्त जागा पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. शिवाय सुरक्षिततेबाबतचे सर्व निर्देश पाळण्याची आमची तयारी आहे, असे मूर्तिकार संघाचे अध्यक्ष गजानन तोंडवळकर यांनी सांगितले. तसेच