News Flash

सहज सफर : मुंबईतील अष्टविनायक

प्रभादेवीचा सिद्धिविनायक म्हणजे मुंबई आणि मुंबईबाहेरीलही गणेश भक्तांचे अतिशय श्रद्धेचे स्थान.

‘बुद्धीचा अधिष्ठाता’ असलेल्या गणेशाची मंदिरे महाराष्ट्रात जागोजागी आढळतात. अष्टविनायक, टिटवाळा, गणपती पुळे, वाईचा ढोल्या गणपती तर प्रसिद्ध आहेत. मुंबईतही गणपतीची अनेक मंदिरे आहेत. प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर, बोरिवलीतील वझिऱ्याचा गणपती, गिरगावचा फडके गणपती मंदिर आदी मंदिरे प्रसिद्ध आहेत. मुंबईतील काही गणेश मंदिरांचा घेतलेला धांडोळा..

प्रभादेवीचा सिद्धिविनायक

प्रभादेवीचा सिद्धिविनायक म्हणजे मुंबई आणि मुंबईबाहेरीलही गणेश भक्तांचे अतिशय श्रद्धेचे स्थान. या मंदिरातील उजव्या सोंडेची मूर्ती चतुर्भुज असून वरच्या दोन हातात अंकुश व कमळ, खालच्या हातात जपमाळ व मोदक आहे. या मंदिरातील मूळ मूर्ती काळ्या दगडाची असून ती रंगवण्यात आली आहे. पूर्वी येथे पुरातन बांधणीचे मंदिर होते. आता मात्र सहा मजली आकर्षक इमारतीसारखे मंदिर उभारण्यात आले आहे. दादर व परळ स्थानकाहून टॅक्सी किंवा बसने या मंदिरापर्यंत जाता येते.

बोरिवलीतील गणेश मंदिर

प्रभादेवीच्या सिद्धिविनायकानंतर बोरिवली पश्चिमेकडील वझीरा नाका येथील गणेश मंदिर देवस्थानाचे महत्त्व आहे. हे मंदिर शेकडो वर्षांपूर्वीचे आहे. पूर्वी केवळ कोळी, भंडारी आणि स्थानिक ग्रामस्थच या मंदिरात दर्शनासाठी येत. आता मात्र या मंदिराचे महत्त्व वाढले असून मुंबईतील अनेक भाविक गणेशदर्शनासाठी येथे येतात. या ठिकाणी पाच मंदिरे आहेत. गणेशाची मूर्ती उत्तर दिशेला असून बाजूला शितला देवीची मूर्ती आहे. त्याशिवाय मारुती आणि स्थानिक ग्रामदेवता आलजी देव यांचीही मंदिरे आहेत.  बोरिवली स्थानकातून (पश्चिम) पायी किंवा रिक्षाने वझिरा नाका येथे जाता येते.

पार्लेश्वर गणपती मंदिर

विलेपार्ले स्थानकापासून काही मिनिटे अंतरावर पार्लेकरांचे श्रद्धास्थान असलेले पार्लेश्व मंदिर आहे. मूळ मंदिर शिवाचे आहे, मात्र मंदिराच्या उजव्या बाजूला गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर फारसे जुने नसून अवघे २५ वर्षांपूर्वीचे आहे. मात्र विलेपार्ले परिसरात या मंदिराला खूप महत्त्व आहे. विशेष म्हणजे येथील गणेशमूर्ती पंचधातूची आहे. मूर्तीवर चांदीचे छत्र आहे. या मंदिरात जाण्यासाठी विलेपार्ले स्थानकावरून चालत वा रिक्षाने जाता येते.

धारावीचा महाराजा

धारावीतील हे गणेश मंदिर दक्षिण भारतातील अदी द्रविड या समाजाने १९१३मध्ये बांधले आहे. तामिळनाडूतील हा दलित समाज मुंबईत आला आणि धारावीमध्ये राहून चामडय़ाचा व्यवसाय करू लागला. या समाजातील काही लोकांनी येथे मंदिराची स्थापना केली. शंभर वष्रे पूर्ण झालेले हे मंदिर पूर्वी पिंपळवृक्षाच्या खाली बांधण्यात आले. १९३९मध्ये त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला.

वांच्छासिद्धिविनायक मंदिर, अंधेरी

मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या पाठारे प्रभूंचे हे दैवत. हे मंदिर प्रशस्त असून मंदिरात संगमरवरी रेखीव गणेशमूर्ती आहे. सोन्याचा मुकुट आणि सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेल्या या गणेशाच्या दर्शनासाठी दर मंगळवारी या मंदिरात भाविकांची गर्दी होते. १९२७मध्ये या मंदिराची उभारणी करण्यात आली. वांच्छा या शब्दाचा अर्थ इच्छापूर्ती असल्याने ‘इच्छापूर्ती करणारा गणेश’ म्हणून वांच्छासिद्धिविनायक असे संबोधले जाते. या मंदिराचा १९९७मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला असून पाचमजली इमारतीची उभारणी करण्यात आली. या मंदिरात गणेशासह शिवशंकर, दत्तगुरू, मारुती आणि महालक्ष्मीचीही छोटी व सुबक मंदिरे आहेत. अंधेरी स्थानकाजवळच हे मंदिर आहे.

जोगेश्वरी लेण्यांमधील गणेश मंदिर

मुंबईत मागाठाणे, कान्हेरी, मंडपेश्वर, जोगेश्वरी आदी लेण्या आहेत. जोगेश्वरी लेणीमध्ये गणेशाचे मंदिर आहे. गुहेत असलेले हे मंदिर शिल्पसौंदर्याचा उत्तम नमुना. गणेशमूर्ती दगडात कोरलेली असून त्यावर शेंदुराचा लेप आहे. गुहेच्या समोर दोन खांब असून त्यावर कोरीवकाम आहे. जोगेश्वरी हे लेणी ही शैव लेणी असून लेण्याच्या सुरुवातीलाच गणेश मंदिर आहे. ही दक्षिणाभिमुख मूर्ती आहे. जोगेश्वरी स्थानकापासून रिक्षाने किंवा बसने येथे जाता येते.

पिंपळ गणेश मंदिर, माजगाव

माजगावमधील बीपीटी कंटेनर रोडवर एका पिंपळाच्या झाडाला गणेशमूर्तीसारखा आकार आलेला आहे. भाविकांनी येथे गणेशमंदिर स्थापन केले आहे. ज्या ज्या ठिकाणी गणेशमूर्तीसारखा आकार झाडाला आहे, तिथे चांदीचा मुकुट बसवण्यात आला असून भाविकांची दर्शनासाठी येथे नेहमी गर्दी होते. पूर्वी हे स्थळ पूर्णत: उघडे होते, आता या ठिकाणी छोटेखानी मंदिर उभारण्यात आले आहे. भायखळा स्थानकातून बीपीटी कंटेनर रोडमार्गे या ठिकाणी जाता येते.

गिरगावमधील फडकेवाडीतील गणपती

चर्नी रोड स्थानकावरून २० मिनिटांच्या अंतरावर गिरगावमध्ये फडकेवाडीत हे गणेश मंदिर आहे. मूळच्या अलिबागमधील असलेल्या यशोदा गोविंद फडके यांनी १८९०मध्ये येथे गणेश मंदिर बांधले. पतीच्या अकाली निधनामुळे निपुत्रिक राहिलेल्या यशोदाबाईंनी गणपतीला आपले पुत्रे मानून येथे मंदिराची उभारणी केली. पुढे त्यांच्या स्नेही व नातलगांनी या मंदिराची सांभाळणी केली आहे. गाभाऱ्यातील गणेशमूर्तीचे मखर आणि गाभाऱ्याचा दरवाजा चांदीचा आहे. चर्नी रोड स्थानकाहून टॅक्सीने येथे जाता येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 1:40 am

Web Title: ganesh temple in mumbai
Next Stories
1 नवउद्य‘मी’ : सुवर्णत्रिकोण साधणारी प्रयोगशाळा
2 केईएममधील डॉक्टरांच्या वसतिगृहात डेंग्यूच्या अळ्या
3 आता मुंबई विद्यापीठ दिवाळी अंकाच्या उद्योगात
Just Now!
X