गणेशोत्‍सव मंडळांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिलासा दिला. गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ५ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. तसेच सद्य स्थितीमध्‍ये वेगवेगळया सहा परवानग्या घ्‍याव्‍या लागातात त्‍या एकाच ठिकाणी एकाच मिळण्‍याची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहेत.

सह्याद्री अतिथीगृहावर मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी गणेशोत्सवाबाबत बैठक घेतली. मुंबई भाजपा अध्‍यक्ष आणि आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने ही बैठक पार पडली. या बैठकीला गृह विभागाचे सचिव, पोलिस महासंचालक, मुंबई व ठाण्‍याचे पोलीस आयुक्‍त, महापालिका व एमएमआरडीएचे आयुक्‍त तसेच गणेशोत्‍सव समन्‍वय समितीचे अध्‍यक्ष अॅड. नरेश दहिबावकर, गणेशोत्‍वस समन्‍वय महासंघाचे अध्‍यक्ष जयेंद्र साळगावकर, उपाध्‍यक्ष व पुण्‍याच्‍या महापौर मुक्‍ता टिळक, प्रमुख कार्यवाह सुरेश सरनौबत, किरण खानोलकर, किसन चोपडे, अविनाश जाधव, राजेंद्र झेंडे, उत्‍तम माटले उपस्थित होते.

बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंडपाच्‍या परवानगीचे अर्ज करण्‍याकरिता ५ सप्‍टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांवरील गणेशोत्‍सव साजरा करण्‍यावरून दाखल करण्‍यात आलेले गुन्‍हे मागे घेण्‍याबाबत गठीत करण्‍यात आलेल्‍या उपसमितीला गुन्‍हे मागे घेण्‍याबात सांगण्‍यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच यावर्षी अर्ज करताना त्‍यासोबत सादर केलेली कागदपत्रे डिजिटल पध्‍दतीने संग्राह्य करण्‍यात येतील. त्‍यामुळे मंडळांना पुन्‍हा ही कागदपत्रे दरवर्षी सादर करावी लागणार नाहीत. मंडळांना सद्य स्थितीमध्‍ये वेगवेगळया सहा परवानग्या घ्‍याव्‍या लागतात. त्‍या एकाच ठिकाणी एकाच अर्जात मिळण्‍याची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे. ज्‍यांचे परवानगी अर्ज यावर्षी रद्द झाले आहेत त्‍या मंडळांशी चर्चा करून त्‍यांना कायदेशीर मार्गाने परवानगी कशी देता येईल याबाबत चर्चा करून मार्ग काढण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.