नवरात्रीच्या उत्सवाला उधाण आले असताना मुंबईतल्या गरबा मंडळाने रोजच्या तिकीटांचे दर दुप्पट करण्याचा गल्लाभरू निर्णय घेतला आहे. नवरात्रीच्या चार दिवसांत मुंबईकर मोठय़ा संख्येने गरबा खेळायला बाहेर पडतात. त्यामुळे मोठय़ा मंडळांनी ६०० रुपयांचे तिकीट १२०० रुपयांपर्यंत तर छोटय़ा मंडळांनी २०० रुपयांचे तिकीट ४५० रुपयांपर्यंत वाढवले आहे. मात्र असे असूनही गरबा खेळणाऱ्यांच्या उत्साहाला जराही धक्का लागला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याशिवाय शेवटच्या दोन दिवसांसाठी मुंबई पोलिसांकडून गरब्याला मध्यरात्रीपर्यंत परवानगी मिळाल्याने गरबा मंडळांनी आíथक उपन्न वाढण्याचा चोख हिशेब बांधला आहे.
मुंबई व उपनगरात गुजराती समाज नवरात्रोत्सव मंडळ, संकल्प दांडिया नवरात्री मंडळ, कोरा केंद्र नवरात्री, नवरात्री उत्सव, फर्स्ट रोड नवरात्री महोत्सव ही प्रमुख सहा नवरात्रोत्सव मंडळे आहेत. याशिवाय अनेक छोटीछोटी मंडळेही हजारोंच्या संख्येने आहेत. या मंडळात हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी येतात. यापाश्र्वभूमीवर बोरिवली, दहिसर, गोरेगाव, घाटकोपर, विलेपाल्रे आदी विभागातील छोटय़ा मंडळांनी शेवटच्या चार दिवसांसाठी रोज १०० ते २०० रुपयांना मिळणारे तिकीट ३५० ते ४५० रुपयांना केले आहे.
नऊ दिवसांत मोठा सोहळ्याचे आयोजन करताना प्रचंड खर्च होतो. मात्र नवरात्र आपला पारंपारिक सण असल्याने हा सण मोठय़ा उत्साहात साजरा व्हावा असा आमचा हेतू असतो. सुरुवातीचे काही दिवस तिकटाचे दर १०० रुपये ठेवले होते. आता केवळ चार दिवस उरले आहेत. त्यात नुकसान होऊ नये आणि कलावंतांना त्याचे योग्य मानधन मिळावे यासाठी दर वाढवले असल्याचे बोरिवलीच्या मिरास नवारात्री उत्सवाचे आयोजक शिवानंद शेट्टी यांनी सांगितले.व्यापारधंद्यासाठी रोज ट्रेनने उत्तरेकडून दक्षिण असा प्रवास करणाऱ्या गुजराती बांधवाना घरी परतायला बराच उशिर होतो.
त्यामुळे बोरिवली, कांदिवली, गोरेगाव, घाटकोपर, मुलुंड या उपनगरातील गरबा मंडळांनी पुढच्या चार दिवसांसाठी रात्री आठ वाजल्यानंतर गरब्याच्या तिकिटांचे दर दुप्पट केले आहेत. त्यात बहुतांश गुजराती समाज हा व्यापारी असल्याने तिकीटांचे दर वाढवूनही त्यांच्या उत्साहात किंचितही फरक पडत नाही असे गुजराती समाजाचा अभ्यास करणारे हिरेन जोशी यांनी सांगितले. त्यात मुंबईत गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवही दिमाखात साजरा व्हावा असे गरबा मंडळांनी ठरविले असल्याने दर वाढवले जात आहेत, असे जोशी यांनी स्पष्ट केले. यंदाच्या वर्षी आम्ही नामांकित कलावंताना घेऊन नवरात्रोत्सव साजरा करत आहोत. या कलावंतांना त्यांच्या नावाप्रमाणे मोठं मानधन देता यावे. यासाठी यंदाच्या वर्षांत तिकिटीचे दर १००० रुपये ठेवले आहेत. गेल्या वर्षी तिकिटांचे दर ५०० रुपये ठवले होते. मात्र तिकीटांचे दर वाढले असले तर या सणाला व्यावहाराच स्वरूप देण्यात येऊ नये असे घाटकोपर येथील गुजराती समाज मंडळाचे आयोजक जीग जिगनेश खिलानी यांनी सांगितले. दरम्यान, तिकीट वाढवले आहे याचा फरक नक्कीच पडतो. मात्र वर्षांतून केवळ एकदा हा सण कुटुंबियांसोबत साजरा करता येतो, त्यामुळे तिकीट वाढले तरी आम्ही गरबा खेळणार असल्याचे आकाश साकारीया या तरुणाने सांगितले.