देवनार कचराभूमी प्रतिबंधित क्षेत्र करण्यात यावी यासाठी पालिकेने राज्य सरकारला पत्र पाठविले आहे. मात्र त्यामुळे आमच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल, असा आक्रोश करीत कचरा वेचकांनी मंगळवारी देवनार कचराभूमीबाहेर आंदोलन केले. तर मुंबईकरांच्या व्यथांची विलंबाने आठवण झालेल्या काँग्रेस नेत्यांचा निषेध करण्यासाठी समाजवादी पार्टीतर्फे कचराभूमीच्या बाहेरच आंदोलन करण्यात आले. मात्र पोलिसांनी वेळीच आंदोलकांना आवरल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
देवनार कचराभूमीत कचरा वेचक, आसपासच्या झोपडपट्टीतील रहिवासी, लहान मुले आणि काही अज्ञात व्यक्तींचा मोठय़ा प्रमाणावर वावर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिका आयुक्त अजय मेहता यांनी ही कचराभूमी प्रतिबंधित क्षेत्र करण्याचा निर्णय घेतला. पालिकेने याबाबत राज्य सरकारला पत्रही पाठविले आहे, परंतु त्या पत्राबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. कचराभूमीतील आगीच्या घटनांना आळा बसावा म्हणून पालिका आयुक्तांनी कचरा वेचकांना सामाजिक संस्थांनी दिलेली प्रवेशपत्र तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले होते. तसेच या कचराभूमीत कचरा टाकणे तात्काळ बंद करण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. त्यामुळे कचरा वेचकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
राहुल गांधी यांच्या कचराभूमी भेटीच्या निमित्ताने कचरा वेचकांनी मंगळवारी आपल्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली. ‘आमचा रोजगार हिसकावू नये’, ‘आम्हाला बेरोजगार करू नका’ असे कागदी बॅनर झळकवून कचराभूमी प्रतिबंधित क्षेत्र करण्याचा निर्णय आणि कचरा टाकणे बंद करण्याच्या मागणीचा कचरा वेचकांकडून निषेध करण्यात आला.
कचराभूमीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर एका बाजूला बांबूचे बॅरिकेट्स उभे करण्यात आले होते. त्यापलिकडे उभ्या राहिलेल्या कचरा वेचक महिला पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करीत होत्या. ‘कचराभूमी बंद झाली तर आमच्या घरातील चूल कशी पेटणार,’ असा आक्रोशही काही वृद्ध महिला कचरा वेचक व्यक्त करीत होत्या.

प्रमुख पक्ष राजकारणात दंग
गोवंडीमध्ये १९९९-२००९ दरम्यान काँग्रेसचा आमदार, तर २००४-२०१४ काळात राष्ट्रवादीचा खासदार होता. त्या वेळी कचराभूमीमुळे रहिवाशांना त्रास होत होता. पण या दोन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींना गोवंडीतील रहिवाशांबद्दल काहीच वाटले नाही. वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी येथे प्रकल्प उभारण्यासाठी कंपनीला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने जमीन दिली. या प्रकल्पामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेली २० वर्षे या भागातील रहिवासी स्वच्छ पाणी, रुग्णालय, शाळा, विद्युतपुरवठा या सुविधा मिळाव्यात म्हणून झगडत आहेत. पण काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप केवळ राजकारणात दंग आहेत. आताच राहुल गांधी यांना कचराभूमीची आठवण कशी आली, असा सवाल समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी पत्रकारांशी बोलताना केला. राहुल गांधी यांच्या कचराभूमी भेटीच्या निषेधार्थ समाजवादी पार्टीतर्फे येथे आंदोलनही करण्यात आले.