मुंबईतील कचऱ्यावर पालिकेचा तोडगा

दर दिवशी मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणावर निर्माण होणाऱ्या सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे डोकेदुखी बनू लागली आहे. त्यामुळे सुक्या कचऱ्यातून ‘रॉक गार्डन’ची निर्मिती करण्याचा विचार पालिका प्रशासन पातळीवर सुरू आहे.

मुंबई महापालिकेने मुंबईमध्ये ४६ ठिकाणी सुका कचरा वर्गीकरण केंद्रे सुरू केली आहेत. अशासकीय संस्थांच्या मदतीने ही केंद्रे चालविण्यात येतात. या केंद्रांमध्ये सुका कचरा गोळा करून आणला जातो. त्यामधील प्लास्टिक, काच, धातू आदी वेगळे करण्यात येते आणि पुनर्चक्रीकरणासाठी पाठविण्यात येते. मुंबईकरांनीही सुका आणि ओला कचरा स्वतंत्र ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर सुका कचरा उपलब्ध होत आहे. मनुष्यबळाअभावी सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे.

सुक्या कचऱ्यामध्ये तुटलेली चिनीमातीची भांडी, काचेच्या बांगडय़ा, निरुपयोगी विद्युत उपकरणे, सिमेंटच्या पिशव्या आणि तत्सम कचऱ्याचा समावेश असतो. पंजाबमधील चंडीगड शहर प्रशासनाने उद्यानांमध्ये विविध टाकावू वस्तूंपासून प्राणी, पक्षी, बाहुली, पुरुष आदींच्या कलाकृती साकारून ‘रॉक गार्डन’ साकारले आहे. टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापरातून कलाकृती साकारता येतात. त्यामुळे मुंबईतील मैदान वा उद्यानांत सुक्या कचऱ्यापासून रॉक गार्डन साकारण्यात यावे अशी मागणी करणारी ठरावाची सूचना शिवसेनेच्या नगरसेविका वैशाली शेवाळे यांनी पालिका सभागृहात मांडली होती. सभागृहाने ती मंजूर करून आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविली होती. या ठरावाच्या सूचनेला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी या सूचनेचा विचार करण्यात येईल, असे प्रशासनाने अभिप्रायात नमूद केले आहे. त्यामुळे लवकरच मुंबईत सुक्या कचऱ्यापासून रॉक गार्डन साकारण्याची शक्यता आहे.