वजन वाढवून पैसे कमवण्यासाठी कंत्राटदारांची क्लृप्ती; सात ठेकेदारांविरोधात पालिकेची पोलिसांत तक्रार

मुंबईतील कचरा वाहून नेण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदारांकडून कचऱ्याचे वजन वाढवण्यासाठी त्यात बांधकामाचा राडारोडा(डेब्रिज) मिसळण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशा पद्धतीने कचऱ्याचे वजन वाढवून पालिकेकडून जादा पैसे वसूल करणाऱ्या सात कंत्राटदारांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच यापुढे असे प्रकार रोखण्यासाठी कचराभूमीवर कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांची अचानक तपासणी आणि व्हीडिओग्राफी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

बांधकामस्थळी निर्माण होणारे डेब्रिज आणि नाल्यातील गाळ वाहून नेण्यासाठी प्रतीटन ४० रुपये, तर मुंबईत निर्माण होणारा ओला व सुका कचरा वाहून नेण्यासाठी प्रतीटन ८७५ रुपये कंत्राटदारांना दिले जातात. कचराभूमीपर्यंत डेब्रिज वाहून नेण्यासाठी अतिशय कमी पैसे मिळत आहेत. त्यामुळे कंत्राटदार वजन वाढविण्यासाठी ओल्या आणि सुक्या कचऱ्यामध्ये डेब्रिज मिसळून दामदुपटीने पैसे कमवू लागले होते. याबाबत तक्रारी आल्यानंतर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने अचानक तपासणी सुरू केली. या तपासणीमध्ये २४ ठिकाणी कचऱ्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर डेब्रिज मिसळण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. या गैरव्यवहाराबाबत पालिकेने सात कंत्राटदारांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त विजय बालमवार यांनी दिली.

अंधेरी परिसरात सात, कुर्ला भागात पाच, सांताक्रूझमध्ये चार, दादर व मालाड भागातील प्रत्येकी दोन घटनांमध्ये कचऱ्यात डेब्रिज मिसळण्यात आल्याचे उघड झाले आहे. भायखळा, बोरिवली, दहिसर, तसेच कुर्ला (प.) येथील रिफ्यूज ट्रान्सपोर्ट स्टेशन येथे कचऱ्यामध्ये डेब्रिस मिसळण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालिकेने सात कंत्राटदारांविरोधात कुर्ला व विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कचऱ्यात डेब्रिज मिसळणाऱ्या कंत्राटदारांविरोधात पालिकेने कडक भूमिका घेतली असून पालिकेने या कंत्राटदारांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे, असे सांगून विजय बालमवार म्हणाले की, कचरा वाहून नेणाऱ्या गाडय़ा आणि कचऱ्याचे वजन याबाबत पारदर्शकता आणण्यासाठी देवनार कचराभूमीत अत्याधुनिक संनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. कचराभूमीत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक वाहनाचे वजन, वाहनाच्या पुढील व मागील नंबरप्लेटचे छायाचित्र, वाहन जेण्याची व जाण्याची वेळ संगणकीय पद्धतीने नोंदविण्यात येत आहे. या नोंदींच्या आधारे कंत्राटदारांना पैसे दिले जात आहेत.

वर्गीकरणाचा फायदा!

मुंबईमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून पालिकेने ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. तसेच कचरा वर्गीकरण केंद्र उभारण्यात येत आहेत. आतापर्यंत ३८ कचरा वर्गीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून या संदर्भात विविध स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. याच उपाययोजनांअतर्गत कचरा संकलनाबाबत अचानक तपासणी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिले होते. या तपासणी दरम्यान २४ ठिकाणी कचऱ्यामध्ये डेब्रिज मिसळण्यात आल्याचे निदर्शनास आले.