एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणारी २३ वर्षीय अभियंता तरुणी गूढरित्या बेपत्ता झाली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तिचा शोध स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखाही घेत आहे.
मूळ हैदराबादची असललेली ही २४ वर्षीय तरुणी उपनरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते. दीड वर्षांपासून ती या कंपनीत काम करत असून अंधेरी येथे होस्टेलमध्ये रहाते. नाताळच्या सुट्टीनिमित्त ती आंध्रप्रदेशातील मच्छलीपट्टणम येथील आपल्या घरी गेली होती. ४ जानेवारी रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ती  विशाखापट्टण एक्स्प्रेसने मुंबईला निघाली. ५ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोहोचली. तिच्या कुटुंबियांनी तिला दूरध्वनी केला. मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. तिच्याकडे दोन फोन होते. परंतु दोन्ही फोनवर केवळ रिंग होत होती. त्यामुळे वडिलांनी नेरूळ येथील भावाला फोन करून चौकशी करण्यास सांगितले. तिच्या काकांनी चौकशी केली असता गाडी वेळेवर आली होती, अशी माहिती मिळाली. तिच्या हॉस्टेल आणि कार्यालयातही काकांनी चौकशी केली. परंतु ती आली नव्हती. त्यामुळे त्यांनी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तिच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन काढले तेव्हा ते भांडुप आणि कामाठीपुरा येथे दिसत होते.  या प्रकरणाचे गांभीर्य पाहून रेल्वे पोलिसांसोबत गुन्हे शाखा ५ व स्थानिक पोलीसही या प्रकरणाचा तपास करत आहेत.
बारमधील हत्या प्रकरणात तिघांना अटक
मुंबई: चेंबूरच्या एका बारमधील सुरक्षा रक्षकाची हत्या करून लूट करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा ६ च्या पथकाने अटक केली आहे. गेल्या २९ डिसेंबर रोजी ८ जणांच्या टोळीने हा हल्ला केला होता. चेंबूर, टिळकनगर येथील विजयलक्ष्मी बारमध्ये पहाटे ३ च्या सुमारास आठ जणांनी हल्ला करून चार कर्मचाऱ्यांना मारहाण केली व त्यांच्याकडील मोबाइल तसेच १ हजार रुपये लुटून नेले.यावेळी हल्लेखोरांच्या हल्ल्यात बारचा सुरक्षा रक्षक वीरेंद्र केशरी हा ठार झाला. याप्रकरणी तपास करून आकाश कुमार वर्मा (२५),आशुतोष पांडे (२६),अन्वर अली साबीर अली (४०) यांना अटक केली असून अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.