नरिमन पॉइंट येथील मेकर्स टॉवर्स इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून पडून एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला. चंदा पवार (१८) असे या तरुणीचे नाव असून एका हिरे व्यापऱ्याच्या घरी ती मुले सांभाळण्याचे काम करत होती. बुधवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली. कफ परेड पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असली सांगितले असले तरी तिच्या कुटुंबियांनी मात्र यामागे घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.
चंदा पवार (१८) ही तरुणी कफ परेडच्या आंबेडकर नगर वसाहतीत रहात होती. गेल्या दीड वर्षांपासून ती नरीमन पॉईंट येथील मेकर्स टॉवर्स मधील रमेश बालचंदानी या हिरे व्यापाऱ्याच्या घरात मुले सांभाळण्याचे काम करत होती. ती चोवीस तास बालचंदानी यांच्या घरात राहात होती. बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजता चंदा इमारतीच्या खालील मोकळ्या जागेत रक्ताच्या थारोळ्यात आढळली. तिला त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. रात्री ती नियमित वेळेप्रमाणे जेवण झाल्यानंतर झोपण्यासाठी गेली होती, असे घरमालक बालचंदानी यांनी सांगितले. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.
..रविवारी ती घरी जाणार होती.
चंदा या महिन्या अखेरीस हे काम सोडणार होती. तिला कसलाच तणाव नव्हता. ती आत्महत्या करूच शकत नाही, असा ठाम दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे. रविवारी ती घरी येणार होती. मला रविवारी कर्णफुले घ्यायला जायचे आहे, असे तिने मला फोनवर सांगितले होते. ती एकदम व्यवस्थित होती, असे तिच्या भावाने सांगितले. पोलिसांनी मात्र कुठल्याही प्रकारच्या घातपाताची शक्यता फेटाळून लावली