मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत शिक्षण आणि रोजगारासाठी आरक्षित घटकांप्रमाणे सवलती द्याव्यात, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली.

आरक्षणाच्या मुद्दय़ावर बोलताना पाटील म्हणाले की, सांविधानिक प्रक्रिया पूर्ण करून मराठा आरक्षण लागू करण्यास वेळ लागणार होता तेव्हा भाजप सरकारने मराठा समाजासाठी शिक्षण व रोजगारासाठी विविध सवलती दिल्या होत्या. पण भाजप सरकारच्या सारथीसारख्या अनेक उपक्रमांमध्ये महाविकास आघाडी सरकारने अडथळे निर्माण केले आहेत आणि आर्थिक तरतूद रोखली आहे. आता राज्य सरकारने ताबडतोब आपली भूमिका बदलून मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी पावले टाकली पाहिजेत. पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणासाठी व रोजगारासाठी सवलती देऊन आरक्षणासारखा लाभ दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचा परिणाम होऊ नये म्हणून राज्य सरकारने त्वरित विशेष अध्यादेश काढून आरक्षणाचे लाभ पूर्ववत चालू ठेवावेत, अशी मागणी मराठा आरक्षणासाठी बाजू मांडणारे प्रा. डॉ. बाळासाहेब सराटे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.