News Flash

अमित ठाकरेंवर राजकीय जबाबदारी द्या; मनसे नेत्यांची राज ठाकरेंकडे मागणी

तरुणांना पक्षाकडे आकर्षित करुन घेण्यासाठी अमित ठाकरेंना प्रत्यक्ष राजकारणात उतरवून विशिष्ट जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

अमित ठाकरेंवर राजकीय जबाबदारी द्या; मनसे नेत्यांची राज ठाकरेंकडे मागणी
अमित ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेची सध्याची नाजूक स्थिती पाहता पक्षामध्ये आता नवचैतन्य निर्माण झाल्याशिवाय तग धरणे अवघड आहे. याची प्रकर्षाने जाणीव झाल्याने मनसे नेत्यांची यावर उपायांची चाचपणी सुरु केली आहे. त्यानुसार, ‘राज’पुत्र अमित ठाकरे यांच्यावर राजकीय जबाबदारी टाकण्यात यावी, अशी मागणी मनसे नेत्यांनी राज यांच्याकडे केली आहे.

मुंबईत बुधवारी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी पक्षाला पुढे घेऊन जाण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी नेत्यांनी आपापली मते मांडली. दरम्यान, पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी तरुणांना पक्षाकडे आकर्षित करुन घेण्यासाठी अमित ठाकरेंना प्रत्यक्ष राजकारणात उतरवून विशिष्ट जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीला इतर नेत्यांनीही दुजोरा दिला. मात्र, यावर राज ठाकरे यांनी कोणतेही मत व्यक्त केले नाही.

मनसे अनेक मुद्द्यांवर सातत्याने लढत आली आहे. त्यातील महत्वाचा मराठी भाषेचा मुद्दा असून त्याबाबत पक्षाची भुमिका लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न करण्यात यावेत याबाबत यावेळी चर्चा झाली. तसेच नेत्यांनी आपापल्यापरीने पक्षाचे आणि राज ठाकरेंचे धोरण जनतेपर्यंत पोहोचावे यासाठी काय करता येईल याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

दरम्यान, आगामी २०१९च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची नवी निवडणूक योजना लवकरात लवकर तयार होईल, असेही काही नेत्यांकडून सांगण्यात आले. तसेच अमित ठाकरे हे विविध सामाजीक कार्यांद्वारे सध्या कार्यरत असले तरी एवढ्यावर राहून चालणार नाही. त्यांना संघटनेमध्ये विशिष्ट जबाबदारी देण्यात यावी, त्यामुळे तरुण वर्गाला पक्षाकडे आकर्षित करता येईल, अशी चर्चा यावेळी झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2018 9:14 pm

Web Title: give political responsibility to amit thackeray mns leaders demands to raj thackeray
Next Stories
1 वेळ पडल्यास राजीनामा फेकून देईन, नाणार प्रकल्पावरुन नारायण राणे आक्रमक
2 शिर्डीच्या साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा
3 उल्हासनगरने मर्यादा ओलांडली, मुंबईला टाकलं मागे
Just Now!
X