04 March 2021

News Flash

कांजूरमार्गमध्ये भव्य मेट्रो टर्मिनस

एकाच ठिकाणी ३ कारशेड, ३ स्थानके

(संग्रहित छायाचित्र)

संजय बापट

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोचे आरेमधील कारशेड कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करण्याच्या निर्णयामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मोठा दिलासा मिळाला आहे.

कारशेडसाठी जागेच्या शोधात असलेल्या प्राधिकरणाने मेट्रो-३ प्रमाणेच मुंबई-ठाणे आणि जोगेश्वरी- कांजूरमार्ग या अन्य दोन मेट्रोंसाठीही कांजूरमार्गलाच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी कारशेडसोबतच तीन मेट्रो स्थानके होणार असल्याने दादरच्या धर्तीवर कांजूरमार्गमध्ये भव्य मध्यवर्ती मेट्रो टर्मिनस उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याची जबाबदारी दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन (डीएमआरसी)वर सोपविण्यात आल्याची माहिती प्राधिकरणातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

पर्यावरणाच्या मुद्दय़ावरून कुलाबा- वांद्रे- सीप्झ मेट्रोचे आरेमधील कारशेड कांजूरमार्गला हलविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. मात्र ही जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा करीत केंद्र सरकारने त्यास विरोध दर्शविल्याने वाद सुरू झाला आहे. राज्य सरकारने मात्र केंद्राचा दावा फेटाळून लावत कांजूरमार्गला कारशेड उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी १०२ हेक्टर जमीन ‘एमएमआरडीए’ला देण्यात आली आहे. केंद्र-राज्य सरकार वादात मेट्रो-३चे काय होणार याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू असली तरी कांजूरमार्गला कारशेड उभारण्याच्या निर्णयामुळे एमएमआरडीएला मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.

भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महानगर प्रदेशात अनेक मेट्रो मार्गाची कामे सुरू करण्यात आली. मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजनही उरकण्यात आले. मात्र बहुतांश मेट्रो मार्गासाठी कारशेडची व्यवस्थाच करण्यात आलेली नाही, त्यामुळे मेट्रो प्रकल्प पूर्ण झाला तरी कारशेडअभावी अनेक मेट्रो मार्ग रखडण्याच्या अडचणीमुळे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली होती.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- वडाळा- ठाणे- कासारवडवली-मेट्रो-४ साठी ठाण्यात मोगरपाडा येथे कारशेड उभारण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न आहे. मात्र स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे कारशेडच्या जागेचा प्रश्न सुटू शकलेला नाही. अशाच प्रकारे जोगेश्वरी- कांजूरमार्ग मेट्रो-६ मार्गासाठी पहाडी गोरेगाव येथे कारशेड उभारण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न होता. निवास आरक्षणाच्या माध्यमातून जागेच्या बदल्यात मालकाला विकास हस्तांतरण हक्क देण्यात येणार होते. परंतु हा प्रस्ताव व्यवहार्य नसल्याने पर्यायी जागेच्या शोधात असलेल्या ‘एमएमआरडीए’ने आता कांजूरमार्गला हे कारशेड करण्याचा निर्णय घेतला आहे.

सीएसटी-ठाणे-कासारवडवली कारशेडचेही स्थलांतर

* सीएसटी-ठाणे-कासारवडवली कारशेडही कांजूरमार्गला स्थलांतरित करण्यात येणार असून, बदलापूर-कांजूरमार्ग मेट्रो-१४चे स्थानकही याच ठिकाणी होणार आहे. यामुळे कारशेडच्या जागेपोटी पडणारा तीन ते चार हजार कोटी रुपयांचा ‘एमएमआरडीए’चा आर्थिक भार वाचणार आहे. शिवाय एकाच ठिकाणी तीन कारशेड आणि तीन स्थानके  येणार आहेत.

* पूर्व आणि पश्चिम तसेच ठाणे- मीरा-भाईंदर आदी भागांत धावणाऱ्या मेट्रोंसाठी कांजूरमार्गला मध्यवर्ती टर्मिनस उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनवर सोपविण्यात आली असून दीड महिन्यात हा आराखडा तयार होईल, असेही सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 12:22 am

Web Title: grand metro terminus in kanjurmarg abn 97
Next Stories
1 मिठी नदी पात्रातील बाधितांचे तात्काळ स्थलांतर करा -मुख्यमंत्री
2 महाविद्यालये बंद, तरी रॅगिंग सुरूच
3 ठाणे जिल्ह्य़ातील भाजप-सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Just Now!
X