आपल्याच नातीचा विनयभंग करणाऱ्या आजोबाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाचं म्हणजे मुलीची दुसऱ्या दिवशी हार्ट सर्जरी होती. दक्षिण मुंबईतील रुग्णालयात तिच्यावर हार्ट सजरी करण्यात येणार होती. पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी आजोबाला अटक केली आहे.

शाळेत शिकवलं असल्यामुळे मुलीला ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’बद्दल माहिती होतं. मुलीने नर्सकडे आजोबांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केली असल्याची तक्रार केली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

काही महिन्यांपूर्वी मुलीच्या आईचं निधन झालं असून ती हिंगोली येथील अनाथआश्रमात राहत होती. मुलीच्या ह्रदयात छिद्र असल्याचं समोर आल्यानंतर एनजीओने ह्रदय शस्त्रक्रियेसाठी तिला रुग्णालयात आणलं होतं. ‘तिचे आजोबा तिच्यासोबत आले होते. २२ सप्टेंबरला ही घटना घडली. आपण बेडवर झोपलो असताना आजोबांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचं मुलीने सांगितलं आहे. मुलीने रुग्णालयातील नर्सला बोलावून घटनेची माहिती दिली. नर्सने डॉक्टरांना सांगितल्यानंतर त्यांच्यासाठी हे धक्कादायक होते. यानंतर रुग्णालयाने आम्हाला कळवलं’, अशी माहिती आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली आहे.

मुलीवर शस्त्रक्रिया होण्याच्या एक दिवस आधी ही घटना घडली. आम्ही पॉस्को अंतर्गत आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.