संदीप आचार्य

महाराष्ट्रातील अनाथ अशा ‘विशेष मुलांना’ (मतिमंद, गतिमंद, मानसिक विकलांग) सांभाळणे हे आव्हान असून या क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात मोजक्या संस्था काम करतात. या संस्थांनाही या मुलांचा साभांळ सक्षमपणे करण्यात अनेक अडथळे येत असल्याचे लक्षात घेऊन दादर येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाने अनाथ विशेष मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी मतिमंद, गतिमंद तसेच मानसिक विकलांग अशा अनाथ असलेल्या विशेष मुलांच्या संगोपनाचा सर्व भार उचलण्याचा निर्णय घेतला. याबाबत बांदेकर म्हणाले की, टीव्ही मालिकेतील कार्यक्रमात एका पालकाने विशेष मुलांसाठी सिद्धिविनायक काही करणार का असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नातून राज्यातील विशेष मुलांच्या परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर अनाथ असलेल्या विशेष मुलांचा संपूर्ण आर्थिक भार उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव सिद्धिविनाय विश्वस्त मंडळाने सोमवारच्या बैठकीत संमत केला.

सिद्धिविनायक मंदिर न्यासाने याबाबत पहिल्या टप्प्यात प्रत्येक मुलासाठी १० हजार रुपये याप्रमाणे दोन कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करणारा प्रस्ताव तयार केला आहे. सिद्धिविनायकाच्या चरणी लाखो भाविक श्रद्धेने देणग्या देत असतात. त्या सत्कारणी लागाव्या हीच आमच्या संपूर्ण विश्वस्त मंडळाची इच्छा आहे. अंध, अपंग, विशेष मुले तसेच रुग्णसेवेसाठी आणि ११ वे १५ च्या विद्यार्थ्यांसाठी मिळून वर्षांकाठी २५ ते ३० कोटी रुपये लोकसेवेसाठी सिद्धिविनायक विश्वस्त मंडळाकडून दिले जातात, असे बांदेकर यांनी सांगितले.

अपंगत्व आलेल्या जवानांसाठी काम करणाऱ्या पुण्यातील क्विन मेरी या संस्थेला सिद्धिविनायक न्यासाने २५ लाखांची मदत केली असून इमारत बांधण्यासाठी एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

– आदेश बांदेकर, अध्यक्ष, सिद्धिविनायक मंदिर न्यास