मुंबई : मोठय़ा करोना केंद्राच्या अतिदक्षता विभागांमध्ये दर्जेदार उपचार उपलब्ध होण्यासाठी आणि मृत्युदर कमी करण्यासाठी जवळील खासगी रुग्णालयातील तज्ज्ञांशी जोडून देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यानुसार या केंद्राजवळील मोठय़ा खासगी रुग्णालयांची यादी तयार केली जात आहे. लवकरच ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

मोठय़ा करोना केंद्रातील अतिदक्षता विभागात सध्या २४४ खाटा आहेत. यात वाढ करत गोरेगावच्या नेस्कोमध्ये २०० आणि वरळीच्या नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडियामध्ये (एनएससीआय) ३० आणि इतर करोना केंद्रात २० अशा आणखी २५० खाटा वाढविण्यात येणार आहेत. दहिसर आणि वांद्रे कुर्ला संकुलात अतिदक्षता विभाग पालिकेने सुरू केले आहेत. मात्र मनुष्यबळ पुरेसे नसल्याने हे विभाग खासगी कंपनीला चालविण्यास दिले आहेत.

मात्र यातील काही केंद्रांमध्ये मृत्युदर अधिक आहे. म्हणून येथील रुग्णांना अधिक दर्जेदार उपचार देण्यासाठी आता जवळील खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेण्यात येणार आहे.

करोना केंद्रामध्ये गंभीर प्रकृतीचा रुग्ण हाताळताना काही अडचणी आल्यास खासगी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार उपचार दिले जातील. या डॉक्टरांना प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता नसून दूरध्वनी किं वा अन्य माध्यमांद्वारे मार्गदर्शन के ले जाईल. यासाठी जवळील रुग्णालयांची यादी केली जात आहे. त्यानुसार प्रत्येक मोठय़ा आरोग्य केंद्राला एक खासगी रुग्णालय जोडून दिले जाईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.