विदर्भातील मायक्रो फायनान्स कंपन्यांनी लुबाडलेल्या महिलांपासून बैलबाजारातील झोपडपट्टीधारकांपर्यंत विविध आंदोलक आझाद मैदानातील  कोपऱ्यात ठिय्या देऊन बसले आहेत. पण या सगळ्यांमध्येही एक व्यक्ती लोकांचे लक्ष वेधून घेत होती..

‘माननीय मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या प्रश्नांबाबत बीडमध्ये भाषण केले होते. त्या ठिकाणी त्यांनी केलेले भाषण माझ्याकडे आहे. या कंपन्यांनी लुबाडलेल्या महिलांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही..’ आझाद मैदानात महापालिकेसमोरच्या कोपऱ्यात एका बाजूला उभारलेल्या मंचावरून पांढऱ्या पेहरावातले संजय आठवले समोर बसलेल्या हजारभर महिलांशी संवाद साधत होते. लाल, हिरव्या, किरमिजी, निळ्या लुगडय़ांमध्ये अंगाची मुटकुळी करून बसलेल्या या महिला निमूटपणे भाषण ऐकत होत्या. टाळ्या वाजवायच्या ठिकाणी टाळ्यांचे कडकडाट होत होते..

विदर्भातील काही जिल्ह्य़ांमधील महिलांना काही मायक्रो फायनान्स कंपन्यांनी दिलेल्या कर्जाची वसुली दामदुपटीने व्याज आकारून सुरू केली. प्रसंगी या महिलांवर प्रचंड अन्याय आणि अत्याचारही केले. त्याविरोधात या भागातील महिलांनी व पुरुषांनी एकत्र येत ‘महिला कर्जमुक्ती आंदोलन समिती’ स्थापन केली. या समितीने ‘चलो मुंबई’चा नारा देत मंगळवारपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे या आंदोलनासाठी तब्बल दीड-दोन हजार महिला मुंबईत आल्या आहेत, त्यापैकी निम्म्या महिला मुंबई फिरायला म्हणून बाहेर पडल्या होत्या.

या ‘महिला कर्जमुक्ती आंदोलन समिती’च्या मंचाच्या बरोबर विरुद्ध दिशेला म्हणजेच खाऊगल्लीच्या टोकाला एक तंबू टाकून कुल्र्याच्या बैलबाजार येथील एका वसाहतीतील लोकांनी पुनर्वसनाचा मुद्दा लावून धरत धरणे आंदोलन सुरू केले आहे. समोरच्या मोठय़ा मोर्चाच्या तुलनेत हे आंदोलक खूपच कमी असल्याने त्यांचा आवाजही तसा कमीच होता. विशेष म्हणजे समोर मोठे ध्वनिक्षेपक लावून केलेल्या भाषणांमुळे या आंदोलनाचे नेते करत असलेली भाषणे जेमतेम ऐकू येत होती. त्यातही हे नेते सर्व आंदोलकांना कोणत्याही आमिषाला आणि दबावाला बळी न पडण्याबाबत सांगत होते. ‘निवडणुका तोंडावर आल्या आहेत, आत्ता जोर लावला, तरच सर्व कामे होतील,’ या वाक्याला समोरच्या श्रोत्यांनीही मान डोलावली.

या सर्व गदारोळाकडे एक व्यक्ती मात्र अगदी तुच्छतेने बघत होती. या आंदोलनाच्या कोपऱ्यात शिरल्यानंतर समोरच आझाद मैदानाच्या मुख्य भागाकडे जाणारे एक द्वार आहे. हे प्रवेशद्वार बहुतांश वेळा बंदच असते. त्या दाराच्या बाजूला कुंपणालगत अनेक आंदोलक एकल आंदोलने करत असतात. त्यात ‘मुलांना मारहाण करणाऱ्या स्थानिक गुंडाविरोधातील’ आंदोलनापासून ‘बायको नीट नांदवत नाही’ या कारणासाठी आंदोलन करणाऱ्यांपर्यंत अनेकांचा समावेश असतो. याच एकटय़ा आंदोलकांमध्ये ही व्यक्ती राजाच्या तोऱ्यात बसली होती.

अंगात मळलेले कपडे, अस्ताव्यस्त वाढलेले केस, त्या केसांना शोभणारी दाढी, गुडघ्यावर खोचून ठेवलेली टोपी, डोळ्यात प्रचंड बेफिकिरीचे भाव अशा थाटात बसलेल्या या व्यक्तीला कुतूहल म्हणून नाव विचारले. चेहऱ्यावरची रेघही हलू न देता त्याने ‘ग्यानेंद्र चौधरी’ असे टेचात उत्तर दिले. आसपासच्या कल्लोळाचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. दातात एक काडी चघळत तो शांतपणे बसला होता. त्याला बोलते करण्यासाठी आणखी काही प्रश्नांच्या फैरी झाडल्या. त्या फैरींना तेवढय़ाच टेचात उत्तरे भिरकवायला त्याने सुरुवात केली. ‘किस चीज के लिए यहाँ आंदोलन कर रहें हैं?’ या प्रश्नाला त्याने दिलेले उत्तर अचंबित करणारे होते. ‘मैं सब पॉर्न वेबसाइट के खिलाफ आंदोलन कर रहा हूँ,’ असे एका वाक्यात सांगत त्याने त्याच्याजवळील कागदपत्रे काढली..

ग्यानेंद्र चौधरी हा इसम गेली अडीच वर्षे या एका ध्यासाने आझाद मैदानातली ही एका खुर्चीपुरती जागा अडवून बसला आहे. एकामागोमाग एक कागद हाती देत त्याने बोलणे चालू ठेवले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे या पॉर्न संकेतस्थळांनी भारतीय तरुण पिढी बिघडवण्याचे काम सुरू केले आहे. ही बहुतांश संकेतस्थळे परदेशी आहेत. भारतीयांना कामुकतेच्या आहारी लावून त्यांचा ऱ्हास करण्याचे कारस्थान या अश्लील संकेतस्थळांमागे आहे. ही संकेतस्थळे बंद झाली पाहिजेत.. ग्यानेंद्र चौधरी बोलत होते. वरवर वेडसर वाटणाऱ्या या इसमाच्या आंदोलनाचा विषयही काहीसा वादग्रस्त असला, तरी त्याची त्यामागची तळमळ त्याच्या पारदर्शक डोळ्यांमधून स्पष्ट दिसत होती.

ही सर्व अश्लील संकेतस्थळे बंद करावीत, असे अर्ज ग्यानेंद्र चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधान आणि थेट राष्ट्रपतींनाही खरडले आहेत. ही गोष्ट त्यांच्या तोंडून ऐकणे मजेशीर आहे. ‘मैंने देवेंद्र को लिखा हैं, मोदी को भी चिठ्ठी लिखी हैं.. हिंदुस्थान की जवान कौम को बचाना हैं तो ये सब बंद करना होगा’.. (देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी आपल्या गल्लीत राहत असल्यासारखे या सर्वाचे उल्लेख एकेरीतच होतात.) पोलिसांनाही या अवलियाचे आश्चर्य वाटते, तर आसपास आंदोलन करणाऱ्या एकल आंदोलकांना हा माणूस वेडा असल्याचा संशय येतो. आपल्या मागण्या मान्य होऊन या अश्लील संकेतस्थळांवर बंदी येत नाही, तोपर्यंत इथे आंदोलन करतच राहणार, हा ग्यानेंद्र चौधरीचा निर्धार आहे. गेल्या अडीच वर्षांमधील काही दिवसांचा अपवाद वगळता हा इसम दर दिवशी सकाळी आझाद मैदानातल्या या कोपऱ्यात न चुकता येऊन बसतो. दिवसभर काडय़ा चघळत किंवा डोक्यावरील टोपी डोळ्यांवर ओढून डुलकी काढत बसतो आणि उन्हं उतरणीला लागली की, आपल्या घरची वाट चालायला लागतो. आझाद मैदानातल्या या कोपऱ्यातला पिंपळ त्याच्याकडे पाहात बाजूलाच उभ्या असलेल्या महाकाय वडाच्या झाडाकडे बघत आपले हजार लखलखते डोळे मिचकावतो आणि वडाच्या फांद्यांवर आपल्या फांद्यांची टाळी देत सळसळत हसतो..

रोहन टिल्लू -@rohantillu

tohan.tillu@expressindia.com